ब्रिटनमधील वित्तीय क्षेत्रातील कंपनी असणाऱ्या बार्कलेज हूरूनने २०१८ मधील भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार सलग सातव्या वर्षी मुकेश अंबानी यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. याच यादीबरोबर जाहीर केलेल्या अहवालात त्यांनी मुकेश अंबानींच्या संपत्तीबद्दलचा काही तपशील दिला आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांनी मागील वर्षभराच्या कालावधीमध्ये दिवसाला ३०० कोटी कमावले आहेत असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असणाऱ्या मुकेश अंबानींची एकूण संपत्ती ३ लाख ७१ हजार कोटी इतकी आहे. कंपनीच्या शेअर्सची किंमत ४५ टक्क्यांनी वाढल्याने सलग सातव्या वर्षी मुकेश अंबांनीने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे.
भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या या यादीमध्ये मुकेश अंबानींच्या खालोखाल असणाऱ्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील व्यक्तींची संपत्ती एकत्र केली तरी ती अंबानींच्या संपत्तीपेक्षा कमीच आहे. श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एस. पी. हिंदूजा आणि परिवार (१ लाख ५९ हजार कोटी), एल. एन. मित्तल आणि परिवार (१ लाख १४ हजार ५०० कोटी) आणि अझीम प्रेमजी (९६ हजार १०० कोटी) या तीन उद्योजकांचा क्रमांक लागतो. तर मागील वर्षी दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या दिलीप सांघवी यांच्या संपत्तीमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. या वर्षी सांघवी हे ८९ हजार ७०० कोटींच्या एकूण संपत्तीसहीत या यादीत पाचव्या स्थानी आहेत. या यादीत सहाव्या स्थानी कोटक महिंद्रा बँकचे उदय कोटक आहेत. त्यांची एकूण संपत्ती ७८ हजार ६०० कोटी इतकी आहे. त्याखालोखाल सातव्या क्रमांकावर सायरस पुनावाला (७३ हजार कोटी), गौतम अदानी आणि परिवार (७१ हजार २०० कोटी), सायरस मिस्त्री आणि शापूर मिस्त्री हे ६९ हजार ४०० कोटींच्या संपत्तीसहीत संयुक्तरित्या नवव्या स्थानावर आहे.
भारतातील दहा श्रीमंत कुटुंब
या अहावालामध्ये कंपनीने भारतामधील दहा श्रीमंत कुटुंबाच्या संपत्तीचीही माहिती दिली आहे. यामध्ये अंबानी कुटुंब पहिल्या स्थानावर असून त्याखालोखाल गोदरेज, हिंदूजा, मिस्त्री, सांघवी, नाडार, अदानी, दमानी, लोहिया आणि बुर्मान कुटुंबाचा क्रमांक लागतो.
अनिवासी भारतीयांची संख्या
२०१८ सालच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीमध्ये एकूण ६६ अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. यापैकी ६५ टक्के अनिवासी भारतीयांनी स्वत:च्या जीवावर उद्योग व्यवसायामध्ये आपले स्थान निर्माण केल्याचे कंपनीने अहवालात म्हटले आहे. या ६६ अनिवासी भारतीयांपैकी ४५ जणांचे कुटुंबच उद्योगांमध्ये आहे तर २१ हे वैयक्तिकरित्या उद्योग व्यवसाय संभाळतात. श्रीमंत भारतीयांपैकी सर्वाधिक अनिवासी भारतीय संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आहेत. त्याखालोखाल अमेरिका आणि ब्रिटनचा क्रमांक लागतो. १ लाख ५९ हजार कोटींच्या एकूण संपत्तीसहीत एस. पी. हिंदूजा आणि परिवार हे सर्वात श्रीमंत अनिवासी भारतीय ठरले आहेत. तर ३९ हजार २०० कोटींची संपत्ती असणारे युसूफ अली हे युएईमधील सर्वात श्रीमंत भारतीय ठरले आहेत.
या अहवालामध्ये सध्या भारत आगळ्यावेगळ्या आर्थिक परिस्थीतीमधून जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एकीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत पडत असतानाच दुसरीकडे कच्च्या तेलाची किंमत वाढत असल्यामुळे भारतामधील संपत्ती निर्मीतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.