नवी दिल्ली : प्रसिद्ध संतूर वादक भजन सोपोरी यांचे गुरुवारी गुरगावमधील रुग्णालयात कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि संतूर वादक असलेली सौरभ व अभय ही मुले आहेत.
गेल्या वर्षी जून महिन्यात सोपोरी यांना आतडय़ाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. तीन आठवडय़ापूर्वी इम्युनोथेरपी उपचारासाठी त्यांना गुरगाव येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली. अखेर त्यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. सोपोरी यांच्या पार्थिवावर लोढी रोड स्मशानभूमीत शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सोपोरी यांचा जन्म १९४८मध्ये श्रीनगर येथे झाला. त्यांच्या घरातच संतूर वादनाची परंपरा होती. त्यांचे आजोबा आणि वडील पं. शंभूनाथ सोपोरी यांच्याकडून त्यांनी संतूर वादनाचे धडे घेतले. वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांनी संतूर वादनाचा सार्वजिनक कार्यक्रम केला. वॉशिंग्टन विद्यापीठातून त्यांनी पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले, तर वडिलांकडून हिंदूस्थानी संगीताचे शिक्षण घेतले. त्यांना २००४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यापूर्वी संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि जम्मू- काश्मीर राज्य जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.