वॉशिंग्टन : कोविड विषाणूचे नवे उपप्रकार उत्पर्वितनातून पुढे येत असताना कमी मात्रेत या विषाणूंना प्रतिकार करू शकणाऱ्या प्रतिपिंडाचा शोध घेण्यात संशोधकांना यश आले आहे.

‘इम्युनिटी’ या नियतकालिकात म्हटले आहे,की यातून प्रतिपिंडावर आधारित उपचारात आणखी प्रगती होऊ शकेल. उत्परिवर्तित विषाणूंचा जो धोका आहे त्याला तोंड देण्यासाठी हे संशोधन उपयोगी आहे. नवीन प्रतिपिंड हा वेगवेगळ्या विषाणूंना वेगवेगळ्या भागात जाऊन चिकटतो. याचा अर्थ त्याला विषाणू त्या ठिकाणी प्रतिकार करू शकत नाही.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन या अमेरिकेतील सेंट लुईस येथे असलेल्या संस्थेचे प्राध्यापक मायकेल एस. डायमंड यांनी म्हटले आहे, की सध्याचे प्रतिपिंड हे काही विषाणू उपप्रकारांना प्रतिकार करतात पण सर्व उपप्रकारांना प्रतिकार करू शकत नाहीत. कारण हा विषाणू आतापर्यंत अनेकदा उत्परिवर्तित झालेला असून त्यात बदल होत गेले आहेत. जे प्रतिपिंड त्याला विरोध करतात त्यांना नामोहरम करण्यात हे विषाणू प्रकार यशस्वी होत आहेत. शिवाय या विषाणूत काही वेगळे बदलही होत आहेत. विषाणूतील काटेरी प्रथिन हे मानवी पेशीतील श्वसनमार्गात असलेल्या पेशींना चिकटत असते. ज्या वेळी हे प्रथिन पेशींना चिकटू दिले जात नाही तेव्हा विषाणू रोग निर्माण करू शकत नाहीत. आतापर्यंत या विषाणूच्या काटेरी प्रथिनात अनेक बदल झाले असून ते प्रतिपिंडांना  हुलकावणी देत आहेत.

बहुतांश विषाणू प्रकारांवर उपयुक्त असलेले प्रतिपिंड तयार करण्यासाठी वैज्ञानिकांनी उंदरांमध्ये प्रयोग केले होते. पेशीला काटेरी प्रथिन ज्या भागात जाऊन चिकटते त्याचा यात अभ्यास करण्यात आला. यात प्रतिपिंड तयार करणाऱ्या पेशी वेगळ्या करण्यात आल्या, त्यातून संबंधित भागाची ओळख पटवणारी ४३ प्रतिपिंडे मिळाली. ही प्रतिपिंडे करोनाच्या वेगवेगळ्या प्रकारांवर कसे काम करतात याचा अभ्यास  करून जास्तीत जास्त प्रकारांना प्रतिकार करू शकेल असे प्रतिपिंड शोधून काढण्यात आले आहे.