रिझर्व्ह बँक लवकरच दहा रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. या नोटांच्या आधारे बोगस नोटांची निर्मिती होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. मात्र दहा रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणताना दहा रुपयांच्या जुन्या नोटादेखील चलनात कायम राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच १० रुपयांच्या नोटा चलनात आणणार आहे. या नोटा महात्मा गांधी मालिकेतील-२००५ मधील असतील. या नोटांच्या दोन्ही नंबर पॅनलवर ‘एल’ अक्षर असेल. यावर गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. यासोबतच या नोटांवर छपाई वर्ष म्हणून २०१७ चा उल्लेख असेल,’ अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे.

‘दहा रुपयांच्या नव्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणण्यात येणार असल्या तरी दहा रुपयांच्या जुन्या नोटादेखील चलनात राहतील,’ असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.