२२ एप्रिलच्या दिवशी पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांना दहशतवाद्यांनी ठार केलं. या पर्यटकांची काहीही चूक नसताना त्यांना धर्म विचारुन ठार करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी मुदतही देण्यात आली. ज्यानंतर देश सोडून जाणाऱ्या महिला, पुरुष यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. काश्मीरमधे देशासाठी वीरमरण पत्करलेल्या जवानाच्या आईला देश सोडायला सांगितलं असा आरोप होतो. त्यावर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मरणोत्तर शौर्यचक्र मिळवलेल्या जवानाच्या आईला देश सोडायला सांगितला?

शौर्य चक्र मिळालेल्या मुदस्सीर शेख यांची आई शमीमा बेगम यांना पाकिस्तानात नेण्यासाठी त्यांच्या उरी येथील घरातून नेण्यात आलं असा दावा त्यांच्या कुटुंबाने केला. ज्यानंतर या प्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बारामुल्ला या ठिकाणी जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी जी चकमक झाली त्यात २०२२ मध्ये मुदसैर शेख हे शहीद झाले. त्यानंतर शमिमा बेगम या २०२३ मध्ये राष्ट्रपती भवन या ठिकाणी गेल्या होत्या. शेख यांना मरणोत्तर शौर्य चक्र देण्यात आलं ते त्यांच्या आईने म्हणजेच शमिमा बेगम यांनी स्वीकारलं होतं.

पोलिसांचं नेमकं निवेदन काय?

मंगळवारी उशिरा बारामुल्ला पोलिसांनी एक निवेदन प्रकाशित केलं. ज्यात हे स्पष्ट करण्यात आलं की मुदस्सीर शेख यांचं बलिदान हा जम्मू काश्मीरसाठी गौरवाचा विषय आहे. तसंच ते देशाचं गौरव ठरले होते. या प्रकरणात प्रसारमाध्यमांनी चुकीच्या बातम्या चालवू नयेत. शमिमा बेगम यांना त्यांच्या घरातून पोलिसांनी नेलं असं काही घडलेलं नाही. एवढंच नाही तर शमिमा बेगम यांचा एक व्हिडीओही समोर आला. शमिमा बेगम म्हणाल्या, “आमच्या घराच्या शेजारी कुणाला तरी पाकिस्तानात परत पाठवण्यात आलं. त्यावेळी माझी प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे माझ्या कुटुंबाने मला श्रीनगरला नेलं. यावेळी अनेकांना असं वाटलं की मला पाकिस्तानात पाठवत आहेत. पण असं काहीही घडलेलं नाही. मला कुणीही येऊन पाकिस्तानात पाठवण्यासाठी घेऊन गेलेलं नाही. या सगळ्या अफवा आहेत.” दरम्यान बेगम शमिमा यांना घरातून पोलिसांनी नेल्याचा दावा त्यांच्या कुटुंबाने केला होता.

मुदस्सीरचे काका मोहम्मद यांनी काय सांगितलं?

मुदस्सीर शेख यांचे काका मोहम्मद युनुस शेख यांनी सांगितलं की फाळणी झाली तेव्हा बेगम शमिमाचे वडील पाकिस्तानात गेले होते. त्यानंतर त्यांनी तिथे निकाहही केला. पत्नीच्या निधानंतर ते आपल्या मुलीसह म्हणजेच बेगमसह इथे आले होते. बेगमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना इथेच दफन करण्यात आलं.

बेगम शमिमा यांचा दुसरा मुलगा नासिरने काय सांगितलं?

बेगम शमिमा यांचा दुसरा मुलगा नासिर मकसुदने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की या भागात मंगळवारी संध्याकाळी SHO आले होते. त्यांनी एक यादी दिली, या सगळ्यांना भारत सोडावा लागणार आहे असं सांगितलं. त्या यादीत माझ्या आईचं म्हणजेच बेगम शमिमा यांचंही नाव होतं. मात्र आज हे सांगण्यात आलं की त्यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली आहे. माझ्या भावाने देशासाठी बलिदान दिलं. असं असतानाही माझ्या आईला देश सोडा असं कसं काय सांगू शकतात? माझी आई सध्या श्रीनगरला आहे असं नासिरने सांगितलं. दरम्यान ५९ जणांना पाकिस्तानात परतण्यासाठी पोलिसांनी पंजाबला पाठवलं आहे अशीही माहिती समोर आली आहे.

मुद्दसिर अहमदच्या पत्नीचं प्रकरण काय?

दरम्यान दुसऱ्या एका प्रकरणात मुद्दसिर अहमद नावाचा एक तरुण त्याच्या दोन वर्षांच्या मुलासह त्याच्या पत्नीला ज्या बसने घेऊन जात होते त्या बसचा पाठलाग करत होता. त्याच्या पत्नीला म्हणजेच सुमायराला अमृतसर या ठिकाणी पाकिस्तानात तिने जावं म्हणून नेलं जात होतं. मी जम्मूहून त्या बसच्या मागे निघालो आहे ज्या बसमध्ये माझ्या बायकोला पाकिस्तानात पाठवण्यासाठी घेऊन जात आहेत. माझा दोन वर्षांचा मुलगा माझ्या आईच्या मांडीवर बसला आहे. माझी आई त्याला भरवण्याचा प्रयत्न करते आहे आणि माझ्या मुलाच्या आईला म्हणजेच माझी पत्नी सुमायराला पाकिस्तानात नेण्यासाठी अमृतसरला नेत आहेत असं मुद्दसिर अहमदने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. सुमायरा रावळपिंडीची आहे. २०१७ मध्ये तिचं आणि माझं लग्न झालं, तेव्हापासून आम्ही आमची सगळी कागदपत्रं नियमितपणे अपडेट करत असतो. तिचा लाँग टर्म व्हिसाही अपडेट आहे तरीही सुमायराला पाकिस्तानात पोहचवण्यासाठी नेत आहेत असं मुद्दसिर अहमदने इंडियन एकस्प्रेसला सांगितलं. पाकिस्तानी नागरिकांना सरकारने देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मी परराष्ट्र मंत्रालयाच्या श्रीनगरमधल्या कार्यालयाशी संपर्कात असतो. आजपर्यंत अशी समस्या उद्भवली नव्हती आता ती उद्भवली आहे.

नाझिया झरगर यांनी काय सांगितलं?

असाच एक अनुभव नाय़िजा झारगर यांनाही आला आहे. माझ्या वडिलांचे चुलत भाऊ गुलाम कादिर आणि त्यांची पत्नी दिलशादा या दोघांनाही रात्री उशिरा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मंगळवारी सकाळी त्यांना निर्वासितांच्या बसमध्ये बसवून अटारीला पाठवण्यात आलं. माझे काका वृद्ध आहेत. तसंच काकूला आधार घेतल्याशिवाय चालताही येत नाही. ४५ वर्षांपूर्वी ते भारतात आले. राजौरीच्या कदल या भागात राहात होते. याआधी असा कुठलाही प्रश्न आला नव्हता. गुलाम कादिर यांच्या मोठ्या मुलाची २००१ मध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली. त्यानंतर २००३ मध्ये त्यांच्या मुलीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांची एकच मुलगी उरली जी विवाहित आहे आणि काश्मीरमध्ये राहते. त्यांची मुलं याच भूमित दफन आहेत तरीही त्यांना देश सोडावा लागतो आहे ही बाब मनाला चटका लावणारी आहे असंही नाझियाने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेहबुबा मुफ्ती यांनी काय म्हटलं आहे?

काश्मीर खोऱ्यातून आत्तापर्यंत २८ जणांना अटारी येथे नेण्यात आल्याची बातमी समो आल्यावर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला या निर्णयचा फेर विचार करण्यासंबंधीची मागणी केली आहे. भारतातून पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर जाण्याचा आदेश केंद्र सरकारने काढला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधल्या अनेक नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. ३० ते ४० वर्षांपूर्वी इथे आलेले लोक, भारतीय नागरिकांशी लग्न केलेल्या मुली किंवा पुरुष, कुटुंब सांभाळणाऱ्या महिला या सगळ्यांचाच यात समावेश आहे. त्यामुळे या निर्णयाचा विचार सरकारने केला पाहिजे असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे.