Tej Pratap Yadav expels from RJD: राष्ट्रीय जनता दल (RJD) पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. तसेच त्यांना कुटुंबातूनही बेदखल केल्याचे लालू प्रसाद यादव यांनी सांगितले. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी या निर्णयामागची सविस्तर माहिती दिली. बेजबाबदार वर्तन आणि कौटुंबिक मूल्ये तसेच सार्वजनिक जीवनातील शिष्टाचारापासून विचलित झाल्यामुळे सदर निर्णय घेतल्याचे लालू प्रसाद यादव म्हणाले आहेत.
तेज प्रताप यादव यांनी शनिवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी अनुष्का यादव नामक महिलेशी प्रेमसंबंध असून १२ वर्षांपासून आपण एकत्र असल्याचा दावा केला होता. तसेच आता ही गोष्ट आपण सर्वांसमोर उघड करत आहोत, असे ते फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले.
पण काही वेळेतच त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आणि एक्सवर दुसरी पोस्ट टाकत सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला. तेज प्रताप यादव सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. तिथूनच त्यांनी पोस्ट केल्याचे सांगितले जाते.
काय म्हणाले लालू प्रसाद यादव?
लालू प्रसाद यादव यांनी अधिकृत एक्स हँडलवर सविस्तर पोस्ट लिहून या निर्णयाची घोषणा केली. ते म्हणाले, वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यास सामाजिक न्यायासाठी आम्ही करत असलेला संघर्ष कमकुवत होतो. मोठा मुलगा ज्या प्रकारचे कृत्य करतो, लोकांशी त्याचे वागणे आणि बेजबाबदार वर्तन हे आमच्या कौटुंबिक मूल्य आणि संस्काराच्या विरोधात आहे. त्याच्या वरील कृत्यामुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून बाहेर करत आहे. आता पक्ष आणि कुटुंबात त्याची कोणतीही भूमिका राहणार नाही. त्याला पक्षातून ६ वर्षांसाठी काढून टाकण्यात येत आहे.
“आपल्या वैयक्तिक जीवनातील चांगले-वाईट आणि गुण-दोष पाहण्यासाठी तो स्वतः सक्षम आहे. त्याच्याशी ज्यांनी संबंध ठेवायचे आहेत, त्यांनी विवेक वापरून निर्णय घ्यावा. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात वावरताना लोकलज्जेचा पुरस्कार केला. कुटुंबातील इतर आज्ञाधारक सदस्यांनीही सार्वजनिक वावरताना याच मूल्याचा स्वीकार केला आणि आचरणातही आणले. धन्यवाद”, असेही लालू प्रसाद यादव पुढे म्हणाले.
कोण आहेत तेज प्रताप यादव?
३७ वर्षीय तेज प्रताप यादव हे लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. त्यांच्यानंतर तेजस्वी यादव हा लहान मुलगा आहे. तेज प्रताप यादव यांनी बिहारचे मंत्रीपदही भुषविले होते. २०१८ साली माजी मुख्यमंत्री दरोगा रॉय यांची नात ऐश्वर्या रॉय हिच्याशी त्यांचे लग्न झाले होते. मात्र काही महिन्यातच ऐश्वर्याने तेज प्रताप यादव यांच्यावर अनेक आरोप करत यादवांच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

तेज प्रताप यादव यांच्या विधानांमुळे राष्ट्रीय जनता दल पक्ष अनेकदा अडचणी आलेला होता. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी होळीच्या दिवशी गणवेशातील पोलिसाला नृत्य करण्यास भाग पाडले होते. तर होळीच्या रंगलेल्या अवस्थेत दुचाकीवरून थेट नितीश कुमार यांचे निवासस्थान गाठून त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या होत्या.