भाजपशी दोन हात करण्यासाठी राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि जद(यू)चे विलीनीकरण होणे गरजेचे आहे, त्यासाठी केवळ आघाडी उपयोगाची नाही, असे मत बिहार मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री रमाई राम यांनी व्यक्त केले आहे.
दोन पक्ष विलीन झाले तर अधिक बळकटी येईल, आघाडीच्या राजकारणात दगाबाजी होऊ शकते, असे रमाई राम म्हणाले. त्यांच्या मताबद्दल बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना विचारले असता त्यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. याबाबतचा निर्णय शरद यादव, नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव घेतील, असे मांझी म्हणाले.
या पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकदा निर्णय घेतला, की त्यानंतर आपली भूमिका काय ते स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र जनता परिवारातील हे दोन पक्ष विलीन होतील किंवा एकत्रित येतील, त्याबद्दल मांझी यांनी भाष्य केले नाही. बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राजद, जद(यू) आणि काँग्रेस एकत्र आले होते त्याचे सकारात्मक निकाल पाहावयास मिळाले, याकडे मांझी यांनी लक्ष वेधले. भाजपचा धुव्वा उडविण्यासाठी भविष्यातही आम्हाला एकत्रित पावले उचलावी लागतील, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदींवर टीका
काळ्या पैशांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका प्रामाणिकपणाची आहे का, असा सवाल मांझी यांनी केला. काळ्या पैशांच्या प्रश्नावरून मोदी केवळ बाता मारत आहेत, त्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत असा आरोप त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rjd jdu merger likely ahead of state assembly polls
First published on: 18-11-2014 at 01:00 IST