राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील चारभुजा पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारी एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह पाय कापलेल्या अवस्थेत शेतात आढळून आला. एका दरोडेखोराने महिलेनं घातलेले चांदीचे पैंजण चोरण्यासाठी महिलेचे पाय कापले. आरोपींनी महिलेच्या मानेवरही वार केले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. कंकूबाई असे मृत महिलेचे नाव आहे.

सोमवारी सकाळी कंकूबाई पतीला जेवण देण्यासाठी घरातून निघाल्या असताना ही घटना घडली. कंकूबाई शेतात जायला निघाल्या मात्र पती काम करत असलेल्या शेतात कंकूबाई कधीच पोहोचल्या नाहीत. कंकूबाईचे पती घरी परतल्यावर त्यांनी मुलांना विचारले की, त्यांची आई कुठे आहे. तेव्हा कंकूबाई सकाळीच त्यांना जेवण देण्यासाठी घरून निघाल्या, असे मुलांनी सांगितले. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलंय.

कंकूबाईचे नातेवाईक व स्थानिकांनी रात्रीपर्यंत तिचा शोध घेतला मात्र त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी चारभुजा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. हत्या करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती राजसमंदचे एसपी शिवलाल यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पाय कापलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडण्याची ही पहिलीच घटना नाही. जयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी शेतात गुरे चरायला गेलेली एक महिला मृतावस्थेत आढळली होती. तिचे पायही कापले गेले होते आणि तिचे चांदीचे पैंजण चोरून नेण्यात आले होते.