अफगाणिस्तानातून अमेरिकेनं लष्कर मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तालिबानकडून अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या भागांवर कब्जा मिळवण्याचे प्रयत्न केले जात असून, मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्यात चकमकी सुरू असतानाच कंदाहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी रात्री तीन रॉकेट डागण्यात आले. यात एक विमानतळावर तर दोन हवाई पट्ट्यांवर डागण्यात आले. त्यामुळे सर्व विमानं रद्द करण्यात आली. विमानतळ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकन लष्कराने परतीचे रस्ते धरल्यानंतर अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान संकट उभं राहिलं आहे. अमेरिकी सैन्याची पाठ फिरताच उत्तर अफगाणिस्तानात तालिबानने उच्छाद मांडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घोषणेपासून तालिबाननं अफगाणमधील विविध भागांवर आक्रमण करण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील ८५ भागांवर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबाननं केला होता. पूर्वी कंदाहार हेच तालिबानचं मुख्यालय होतं. त्यामुळे उत्तर अफगाणिस्तानसह कंदाहारमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यातच आता कंदाहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी रात्री कंदाहार विमानतळाला लक्ष्य करण्यात आलं. तीन रॉकेट विमानतळाच्या दिशेनं डागण्यात आले. यात एक विमानतळाला धडकलं, तर दोन विमानाच्या हवाई पट्ट्यांवर. त्यामुळे रनवेचं नुकसान झालं असून, विमानं रद्द करण्यात आली. यापूर्वी ७ एप्रिल २०२१ रोजीही कंदाहार विमानतळावर तालिबानकडून हल्ला करण्यात आला होता.

तालिबानचा धोका : कंदाहारमधील भारतीय दूतावास बंद?; राजनैतिक सूत्रांनी केला खुलासा

कंदाहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं एएफपी या वृत्तसंस्थेनं रॉकेट हल्ला झाल्याचं वृत्त दिलं आहे. या हल्ल्याबद्दल अधिकची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तालिबानची तिथे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. मॉस्कोमधील तालिबानी शिष्टमंडळाने अफगाणिस्तानच्या ३९८ जिल्ह्यांपैकी २५० जिल्हे ताब्यात घेतल्याचा दावा केलेला आहे.

तालिबानने उत्तर अफगाणिस्तान या त्यांच्या जुन्या बालेकिल्ल्यात जम बसवला असून तेथे वांशिक अल्पसंख्याकांची संख्या जास्त आहे. अनेक कुटुंबे पलायन करीत असून भीतीयुक्त जीवन जगत आहेत. गेल्या १५ दिवसांत एकूण ५६०० कुटुंबांनी त्यांच्या घरातून पलायन केले असल्याचे निर्वासित मंत्रालयाने म्हटले आहे.

दानिश सिद्दीकीची हत्या आणि विटंबना

पुलित्झर पारितोषिक विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांची अफगाणिस्तानात गोळीबारात हत्या केल्यानंतर तालिबानने मृतदेहाचीही विटंबना केली. त्यांची ओळख पटवल्यानंतर तालिबानने हे निर्घृण कृत्य केल्याचे अमेरिकेतील एका नियतकालिकात प्रकाशित झालेल्या वृत्तात म्हटले आहे. सिद्दीकी हे अफगाणिस्तानमधील संघर्ष टिपण्यासाठी तिथे गेले होते. कंदहार शहराच्या स्पिन बोल्दाक भागात अफगाणी फौजा व तालिबान यांच्यातील संघर्षाचे छायाचित्रण करताना त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, तालिबान्यांनी त्यांची भारतीय असल्याचं कळाल्यानंतर हत्या आणि विटंबना केल्याची माहिती समोर आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rockets hit kandahar airport in afghanistan taliban clashes bmh
First published on: 01-08-2021 at 09:44 IST