अमेरिकेत जनमताचा कौल अमान्य करून डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन संकल्पनेचा; लोकशाहीचा अवमान केला आहे. लोकशाहीत बहुमताचा सन्मान करून ट्रम्प यांनी जो बायडेन यांना पदाची सूत्रे सोपवणे आवश्यक होते. ट्रम्प यांनी मात्र याउलट कृती करून सतःची प्रतिमा कलंकित करून घेतली आहे. अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत आम्हाला आदर होता, मात्र त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव मान्य न करता पदाला चिकटून राहण्याची केलेली कृती लोकशाहीविरोधी आणि रिपब्लिकन प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांचा विजय झाला. मात्र त्यांच्या विजयला संमती देण्यात आडकाठी आणायचे हीन कृत्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प यांच्या समर्थकांनी काल धुडगूस घातला. तो प्रकार अत्यंत निषेधार्ह आणि लोकशाही विरोधी आहे,” असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- ‘…लाज वाटायला पाहिजे’, US Capitol मधील हिंसक आंदोलनात तिरंगा दिसल्याने शिवसेना खासदार संतापल्या

“अल्पमतात असताना बहुमताचा सन्मान केला नाही असे आजवर जगात कोणत्याही देशात घडले नाही ते अमेरिकेत ट्रम्प करीत आहेत. निवडणुकीत झालेला पराभव स्वीकारून ट्रम्प यांनी नव्याने पुढील निवडणुकीसाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. मात्र पराभव न स्वीकारता जनमताचा अनादर करून ट्रम्प यांनी रिपब्लिकनचा अवमान केला आहे. लोकशाहीचा अवमान केला आहे,” असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

आणखी वाचा- अजित पवार म्हणतात, “अमेरिकेतील घटना निंदनीय, पण त्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा…”

“भारतात ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत लोकशाहीच्या न्यायानुसर बहुमताचा; जनमताचा सन्मान केला जातो. मात्र जगात महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत सत्तांतर होताना ट्रम्प यांनी केलेला प्रकार लोकशाहीला मारक आहे. त्यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही,” असा घणाघात रामदास आठवले यांनी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpi ramdas athavale on us capitol violence donald trump sgy
First published on: 08-01-2021 at 16:31 IST