कानपूर : मागास समाजाच्या उत्थानासाठी केवळ कायदे करणे पुरेसे नाही, तर अशा लोकांकडे पाहण्याची इतरांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी केले.

सरसंघचालक भागवत कानपूर येथील नानाराव पार्कमध्ये आयोजित केलेल्या वाल्मीकी जयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते. घटनेत तरतुदी केलेल्या आहेत. सरकार कायद्यांची अंमलबजावणी करीत असते. तरीही, आपलेपणा नसेल तर ज्यांच्यासाठी कायदे केले आहेत त्यांना त्यांचा लाभ मिळणार नाही, असे सरसंघचालक म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून सरसंघचालक म्हणाले, ‘‘डॉ. आंबेडकरांनी अनुसूचित जाती आणि दलित समाजासाठी घटनेत तरतुदी केल्या. दलित यापुढे प्रत्येकाबरोबर बसतील, असेही डॉ. आंबेडकर म्हणाले. परंतु, केवळ तरतुदी करणे पुरेसे नाही, मानसिकता बदलण्याची आणि जागृती निर्माण करण्याची गरज आहे.’’

‘‘डॉक्टरसाहेब (डॉ. आंबेडकर) म्हणाले होते की, घटनेत तरतूद करून आम्ही मागास समाजाला राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, सामाजिक स्वातंत्र्य प्रस्थापित होईल तेव्हाच राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य अर्थपूर्ण ठरेल. म्हणूनच, आणखी एका डॉक्टरांनी (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. बळीराम हेडगेवार) सामाजिक सलोखा आणि आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी १९२५ मध्ये नागपुरात कार्य सुरू केले, असे सरसंघचालक भागवत म्हणाले. वाल्मीकी समाजाने संघाच्या शाखांमध्ये येऊन स्वयंसेवकांशी संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.