कोट्टायम : केरळमधील आनंदु अजि या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी करण्यात आलेल्या आरोपांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खंडन केले आहे. दक्षिण केरळ संघाने यासंबंधी एक निवेदन प्रसृत करून अजि याच्या मृत्यूची आणि त्यावरून संघावर करण्यात आलेल्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली.
अजि हा संघाचा स्वयंसेवक होता. त्याचा मृतदेह कोट्टायम जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये आढळला होता. त्याच्या खोलीत सापडलेल्या चिठ्ठीमध्ये, संघामध्ये अनेक वर्षांपासून आपले लैंगिक शोषण करण्यात आले असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणावरून समाजमाध्यमांवरही बरीच चर्चा झाली. तसेच काँग्रेस नेत्यांनी अजिने कथितरित्या केलेल्या आरोपांच्या चौकशीची मागणी केली.
संघाने प्रसृत केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “आनंदु अजिचा अनैसर्गिक मृत्यू दुःखद आणि दुर्दैवी आहे. समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या चिठ्ठीमध्ये संघाविरोधात काही संशयास्पद आणि निराधार आरोप करण्यात आले आहेत. आम्ही जिल्हा पोलिसांकडे लेखी याचिका करून अजिच्या मृत्यूची सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करतो.”