नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय व्यापारासारखे परराष्ट्र धोरण दबावाखाली राबवले जाऊ नये, त्यामागे स्वेच्छा आणि स्वहिताचा विचार असला पाहिजे. हेच खरे स्वदेशीपण आहे, असे मत मांडत सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी आत्मनिर्भरतेचा नारा दिला.

दिल्लीतील विज्ञान भवनात ‘संघाची १०० वर्षांचा प्रवास-नवे क्षितीज’ या विषयावरील दुसरे व्याख्यान भागवत यांनी दिले. आत्मनिर्भरता हा देशाच्या विकासातील कळीचा टप्पा आहे. जे देशात उत्पादित होते ते बाहेरून कशाला आणायचे? देशी बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य द्या. पण, आत्मनिर्भरता याचा अर्थ काहीच आयात करू नका असे नव्हे. ज्या वस्तू आपल्या देशात उत्पादित होत नाहीत, त्या बाहेरून आणाव्याच लागतील. आयात-निर्यात होतच असते. पण, परस्पर देवाण-घेवाण होत राहिली पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्यापार एकतर्फी करायचा नसतो. त्यासाठी बाहेरील देशाचा आपल्यावर दबाव असू नये, अशी स्पष्ट भूमिका भागवत यांनी मांडली.

आंतरराष्ट्रीय व्यापारनितीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या जगालाच वेठीला धरलेले आहे. अमेरिकेने भारताच्या वस्तूंवर २५ टक्के आयातकर लादला आहे. शिवाय, भारत रशियाकडून कच्चेतेल आयात करत असल्याने अतिरिक्त २५ टक्के असा एकूण ५० टक्के आयात कर लादला आहे. अमेरिकेने व्यापारनितीवरून भारतावर दबाव आणला असून त्यामुद्द्यावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारसंबंधांवरून भागवत यांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणाची दिशा स्पष्ट केली.

‘वोकिझम’ आणि ‘कॅन्सल कल्चर’ने जग भयग्रस्त

भागवत यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या देशांमधील संघर्षाचा उल्लेख केला. पहिले महायुद्ध झाले तेव्हा लीग ऑफ नेशन तयार झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली. तरीही आंतरराष्ट्रीय संघर्ष थांबलेला नाही. तिसरे महायुद्ध होणारच नाही असे कोणी सांगू शकत नाही. जगभरात असहिष्णुता, अतिरेकीपणा, कट्टरता वाढलेली आहे. ‘वोकिझम’ आणि ‘कॅन्सल कल्चर’ या जगासाठी मोठ्या समस्या बनलेल्या आहेत, असे भागवत म्हणाले. तुमच्याशी दुसरा सहमत नसेल तर त्याला नाकारले जाते. त्यातून एकमेकांमधील संघर्ष वाढू लागला आहे. प्रत्येक आई-वडिलांना आपल्या पाल्यांची चिंता वाटू लागली आहे. या ‘वोकिझम’चा नव्या पिढीवर काय परिणाम होणार हे त्यांना समजेनासे झाले आहे. हा अतिरेकीपणा वाढला कारण लोकांमधील संवाद संपुष्टात येऊ लागला आहे. लोकामधील व्यक्तिवादाने टोक गाठले आहे, भोगवादामध्ये लोक अधिकाधिक गुंतू लागले आहेत. भौतिकवाद आवाक्याबाहेर जाऊ लागला आहे. लोकामधील संयम संपलेला आहे. संतुलित जगणे लोक विसरले आहेत, असा मुद्दा भागवत यांनी मांडला.

प्राकृतिक संतुलन हाच धर्म

विवेकाशिवाय सुख, नैतिकतेशिवाय व्यापार, तत्वनिष्ठेशिवाय राजकारण आदी महात्मा गांधींनी सांगितलेल्या सात पापांचा उल्लेख करत, धर्मतत्त्वातून या समस्यांवर उपाय शोधता येईल, असे भागवत म्हणाले. एकमेकांचा गळा कापला तर जंगलराज निर्माण होईल. त्यातून जगाला वाचवायचे असेल तर धर्माची गरज आहे. धर्म म्हणजे रिलिजन नव्हे. प्राकृतिक नियमांचे पालन करणे, त्यात संतुलन राखणे म्हणजे धर्म. धर्म सर्वसमावेशक असते, तो वैश्विक असतो. मध्यममार्गी जगणे म्हणजेच धर्म. ही शिकवण भारताने जगाला दिलेली आहे. धर्म हा धर्मपरिवर्तनातून (कन्वर्जन) येत नाही. आचरणातून साधता येतो, पाणी जसे प्रवाही असते तसा हा धर्म आहे, असे विचार भागवत यांनी मांडले.

मंदिर, पाणी, श्मशानात भेदभाव कशाला?

संघाच्या पुढील वाटचालीबद्दल भागवत म्हणाले की, सामाजिक एकता सर्वाधिक महत्त्वाची असेल. जात, धर्म, पंथ, वर्ग यापलिकडे जाऊन समाजात वैयक्तिक मैत्री निर्माण करावी लागेल. एकमेकांच्या कुटुंबांशी मैत्री करावी लागेल. मंदिर, पाणी आणि श्मशानामध्ये भेदभाव असता कामा नये. समाजात अविश्वासाने मोठे काम होत नाही. त्यासाठी सद्भावना टिकवावी लागेल. देशात वेगवेगळे समाज आहेत, ते आपापली उन्नती करत असतील. पण, त्यांच्याशी संपर्क-संवाद साधून त्यांच्यामध्ये संपूर्ण समाजाचा आपणही एक भाग आहोत ही भावना निर्माण केली पाहिजे. काही मूळ धर्म (रिलिजन) आहेत, तर काही बाहेरून आलेले आहेत. पण, या सर्व लोकांची परंपरा एकच आहे. त्यामुळे त्यासर्वांना बरोबर घेऊन पुढे गेले पाहिजे आणि त्यातून गुणवत्तेवर आधारित समाज घडवायचा आहे, त्यासाठी संघ प्रयत्न करत आहे. संपूर्ण समाजालाच संघ बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी ग्वाही भागवत यांनी दिली.

पंचपरिवर्तनाचे ध्येय…

देशभर अनेक लोक राष्ट्रबांधणीचे काम करत आहेत. त्यांनी संघात आले पाहिजे असे नव्हे. पण, त्यांना एकमेकांशी जोडून घेता आले पाहिजे, त्यांच्या नेटवर्किंगचे काम संघ करेल, असे सांगताना भागवत यांनी संघाच्या ‘पंचपरिवर्तन’ सूत्राचे महत्त्वही विशद केले. कुटुंब प्रबोधनातून नव्या पिढीमध्ये संवादाची प्रक्रिया सुरू हईल. त्यांना भारताची संस्कृती-परंपरा कळेल. आई-वडिलांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे. देशाची, पूर्वजांची ओळख करून दिली पाहिजे. कुटुंबासाठी प्रत्येकजण कष्ट करत असतो, त्याने समाजासाठी छोटी-छोटी कामे केली पाहिजेत. त्यातून एकमेकांमध्ये संबंध निर्माण होतील. मुलांमध्ये संवेदनशीलता निर्माण होईल. भाषा, भूषा, भजन, भोजन आणि भ्रमण हे स्वदेशी असले पाहिजे. तर देश कळेल. आणि संविधान, नियम, कायदे याचे पालन केले पाहिजे. त्यातून भारत विश्वगुूरू बनू शकेल. विश्वगुरुने अत्यंत विनम्र असले पाहिजे. आपल्या आचरणातून ते दिसले पाहिजे. तर भारताचा पूर्ण कायापालट होईल, विश्वात सुख व शांती निर्माण होईल, असा आशावाद भागवत यांनी व्यक्त केला.