भारतीय चलन रुपयाचं डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमुल्यन झालंय. मंगळवारी (१९ जुलै) ८०.०५ रुपये प्रति डॉलरपर्यंत ही पडझड झाली. आजपर्यतच्या इतिहासातील हे रुपयाचं सर्वात निचांकी मूल्य आहे. मागील काही दिवसांपासून रुपयाच्या मुल्यात सातत्याने पडझड सुरू आहे. मागील सत्रात रुपया ७९.९७ रुपये प्रति डॉलर होता. मंगळवारी सकाळी रुपयाची सुरुवात ७९.९८ प्रति डॉलरने झाली आणि लगेचच रुपयाचं मूल्य आणखी कमी होऊन ८०.०५ प्रति डॉलर झालं.

रुपयाचं मूल्य ८०.०५ पर्यंत खाली आल्यावर ते रुपया ७९.९३/९४ प्रति डॉलर ट्रेंड करत होता. सोमवारी परदेशी चलन बाजारात अमेरिकेन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १६ पैशांनी घसरला आणि ७९.९८ प्रति डॉलरवर बाजार बंद झाला. मंगळवारी बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच रुपयाची ऐतिहासिक पडझड होऊन ८०.०५ च्या स्तरावर गेला.

शुक्रवारी रुपयाच्या मुल्यात १७ पैशांची वाढ झाली आणि बाजार ७९.८२ प्रति डॉलरवर बंद झाला. त्यामुळे काही दिवस रुपयाचं मूल्य ७९.७९ ते ८०.२० प्रति डॉलर असेल, असा अंदाज बाजार विश्लेषकांनी वर्तवला आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा : विश्लेषण : ‘जीडीपी’च्या आकड्यांमागे दडलंय काय?

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपयातील हे अवमुल्यन कच्च्या तेल्याच्या किमतीतील वाढ आणि बाजारातून काढण्यात येणारी परदेशी गुंतवणूक ही कारणं आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रुपयाच्या पडझडीमागे रशिया युक्रेन युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि दबावात असलेली अर्थव्यवस्था असे अनेक जागतिक कारणं असल्याचं म्हटलंय.