व्होल्गोग्राड रेल्वे स्थानकातील हल्ल्याला २४ तास उलटत नाहीत तोच त्याच परिसरात एका बसमध्ये आत्मघाती हल्लेखोराने आणखी एक स्फोट घडवून आणला. या स्फोटात चौदा जण ठार झाले. रशियात सोशी ऑलिम्पिक स्पर्धाची सुरक्षाव्यवस्था  या हल्ल्यांमुळे अडचणीत सापडली आहे. या पाश्र्वभूमीवर, अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ७ फेब्रुवारीला होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाच्या वेळी पुरेशी सुरक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले.
सरकारी यंत्रणाही बुचकळ्यात
आजवर शांत असलेल्या या शहरात हे स्फोट झाल्याने रशियाच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणांनी तसेच गुप्तचर खात्याने देशभरात सावधगिरीचा इशारा दिला आहे.
रविवारी रेल्वे स्थानकात स्फोट घडविल्यानंतर, अतिरेक्यांनी सोमवारच्या हल्ल्यासाठी सकाळच्या गर्दीची वेळ निवडली.  एका पुरुष आत्मघाती हल्लेखोराने डिटोनेटरच्या मदतीने स्फोट केला व त्याचा मृतदेह सापडला असून त्याची जनुकीय ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.