रशियन सैन्याने युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रवर हल्ला केला आहे. हा प्रकल्प Zaporizhzhia येथे नीपर नदीवर आहे. प्लांटच्या प्रवक्त्याने सांगितले की, गोळीबार शुक्रवारी पहाटे सुरू झाला. (युद्धाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा) गोळीबारानंतर या अणुऊर्जा प्रकल्पाला आग लागली आहे. हल्ल्यानंतर लागलेल्या या भीषण आगीचा व्हिडीओ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

यावेळी झेलेन्स्की म्हणाले की, “रशियाशिवाय इतर कोणत्याही देशाने कधीही अणुऊर्जा युनिट्सवर गोळीबार केलेला नाही. हे आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय की एखाद्या देशाने अणुऊर्जा युनिटवर गोळीबार केलाय. या दहशतवादी देशाने आता अणु दहशतवादाचा अवलंब केला आहे.” असं म्हणत रशिया चेरनोबिलची पुनरावृत्ती करू इच्छित असल्याचा आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे.

दरम्यान, अणुऊर्जा प्रकल्पाला लागलेल्या आगीबाबत व्हाईट हाऊसकडूनही एक वक्तव्य आले आहे. ज्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी “रशियाने या भागातील लष्करी कारवाई थांबवावी आणि अग्निशामक तसेच इतर आपत्कालीन पथकांना प्लांटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी द्यावी” असे आवाहन केले.

Ukraine War: शहराला चारही बाजूंनी फौजांचा वेढा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा खंडित अन्…; पुतिन म्हणाले, “विशेष लष्करी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनीही रशियन सैन्याला हल्ला थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटलं की, “जर या प्रकल्पात स्फोट झाला, तर तो चेरनोबिलपेक्षा १० पट मोठा असेल! रशियाने या प्रकल्पातील आग तत्काळ विझवावी, अग्निशामक दलांना परवानगी द्यावी आणि सुरक्षेसंदर्भातील सर्व पाहणी करावी,” असं कुलेबा यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

हा अणुऊर्जा प्रकल्प आग्नेय युक्रेनमधील औद्योगिक शहर Zaporizhzhia इथं असून ते देशाला अंदाजे ४० टक्के अणुऊर्जेचा पुरवठा करते.