Russian Ambassador Denis Alipov Reaction: भारताने रशियाकडून तेलाची आयात करू नये, यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अनेक महिन्यांपासून दबाव टाकत आहेत. यासाठी त्यांनी भारताच्या वस्तूंवर ५० टक्के आयातशुल्कही (टॅरिफ) लादले. त्यानंतर काल (१५ ऑक्टोबर) त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलत असताना भारत रशियाकडून तेल घेणे हळूहळू बंद करणार असल्याचे म्हटले. ट्रम्प यांनी हे जाहीर केल्यामुळे आता भारत आणि रशियाकडून त्यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलिपोव्ह म्हणाले की, भारत आणि रशियाचे संबंध विश्वासाच्या भक्कम पायावर उभे असून रशियन तेल भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे.

ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारत आणि रशियाकडून सावध पवित्रा घेण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनात म्हटले की, “भारत हा तेल आणि गॅसचा एक महत्त्वाचा आयातदार आहे. अशा अस्थिर परिस्थितीत भारतीय ग्राहकांचे हित जपणे हे आमचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. आमची आयात धोरणे पूर्णपणे ग्राहककेंद्रीत आहेत.”

रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी आज माध्यमांशी संवाद साधत असताना म्हटले की, अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांमध्ये रशिया हस्तक्षेप करू इच्छित नाही. भारत आणि अमेरिका त्यांचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत. तर आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही. मात्र आमचे तेल भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय जनतेसाठी फायदेशीर आहे.

भारत तेलाची आयात सुरू ठेवणार?

भारत रशियन तेलाची आयात बंद करणार असल्याच्या ट्रम्प यांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारला असता डेनिस अलिपोव्ह म्हणाले की, हा प्रश्न भारतासाठी आहे. भारत सरकार राष्ट्रीय हित सर्वप्रथम डोळ्यासमोर ठेवते. आमचे ऊर्जा सहकार्य याचदृष्टीने सुरू आहे.