S Jaishankar on US-India Trade Deal : भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. यावेळी जयशंकर यांनी नमूद केले की, काही गोष्टी अशा आहेत ज्यामध्ये वाटाघाटी केल्या जाऊ शकतात आणि काहींमध्ये नाही. एका व्यापार करारासाठी भारताची अमेरिकेबरोबर बोलणी सुरू आहेत, ज्यामध्ये आपल्यासाठीच्या निर्णायक मुद्द्यांचा आणि मर्यादांचा (red lines) आदर कला जाईल, असे जयशंकर रविवारी एका कार्यक्रमात म्हणाले.

तसेच यावेळी एस. जयशंकर यांनी त्यांनी पुढे असेही सांगितले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या वाटाघाटी अजूनही सुरू आहेत आणि त्या अद्याप कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेल्या नाहीत.

राजधानी दिल्लीत कौटिल्य आर्थिक परिषदेत (केईसी २०२५) बोलताना जयशंकर हे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफच्या संदर्भात म्हणाले की, “मी या मुद्द्याचे महत्त्व कमी करत नाहीये, पण मला वाटत नाही की आपण हे अशा स्थितीपर्यंत घेऊन जावे, जेणेकरून याचा परिणाम संबंधांच्या प्रत्येक पैलूवर होईल…. आपण याला प्रमाणात ठेवले पाहिजे.”

अमेरिकेकडून भारताच्या कृषी आणि दूग्धजन्य पदार्थांच्या बाजारपेठेत आपल्या उत्पादनांना प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र स्वतंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे किंवा त्यांच्याकडून लादलेल्या शुल्काचा उल्लेख न करता ते भारतीय शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांवर परिणाम करू शकणाऱ्या कोणत्याही विरोधातील धोरणाविरुद्ध भिंतीसारखे उभे असल्याचे म्हटले होते.

जयशंकर यांना भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधाच्या सद्यस्थितीबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, “काही समस्या आहेत, कोणीही नाकारत नाहीये. पण मला हेही सांगायचे आहे की, या संबंधांचा मोठा भाग एकतर नेहमीप्रमाणे सुरू आहे, किंवा काही बाबतीत त्याहूनही अधिक चांगल्या पद्धतीने सुरू आहे.”

एस. जयशंकर म्हणाले, “आज अमेरिकेबोबरच्या आपल्या अडचणीचा एक मोठा भाग हा आहे की, आम्ही आपल्या व्यापार चर्चांसाठी अद्याप अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाहीत, आणि आतापर्यंत तिथे पोहोचण्यात आलेल्या अपयशामुळे विशिष्ट प्रकारचे शुल्क लादले गेले आहे,” असे ते म्हणाले.

“याव्यतिरिक्त, दुसरे एक टॅरिफ आहे जे आपण अत्यंत अन्यायकारक मानतो…जे रशियाकडून उर्जेच्या आयातीमुळे लादले आहे आणि अर्थातच दुसऱ्या देशांनीही असे केले आहे, ज्यामध्ये अशा देशांचाही समावेश आहे ज्यांचे सध्या रशियाशी संबंध आपल्यापेक्षा खूपच जास्त शत्रुत्वाचे आहेत.”

जयशंकर पुढे म्हणाले की, अमेरिकेबरोबर एक मजबूत व्यापार करार महत्त्वाचा आहे, कारण अमेरिका ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि अनेक देशांनी आधीच त्याच्याबरोबर असे करार केले आहेत. जयशंकर यांनी जागतिक ऊर्जा क्षेत्रात होत असलेल्या बदलांबद्दलही वक्तव्य केले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की अमेरिका आता एक प्रमुख ऊर्जा निर्यातदार बनला आहे, तर ऊर्जा क्षेत्रात चीनचे वर्चस्व देखील सातत्याने वाढत आहे.

परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, ” गेल्या काही वर्षांत झालेला सर्वात मोठा बदल म्हणजे पूर्वी ऊर्जेसाठी इतर देशांवर अवलंबून असलेला अमेरिका आता पूर्णपणे स्वावलंबी झाला आहे. शिवाय, तो आता जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा निर्यातदारांपैकी एक बनला आहे आणि त्याने तो आपल्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग बनवला आहे.”

“काही गोष्टींवर तुम्ही वाटाघाटी करू शकता आणि काही गोष्टींवर करू शकत नाही. आणि आम्ही त्याबद्दल अगदी स्पष्ट आहोत, आणि हीच चर्चा मार्चपासून सुरू आहे,” असेही जयशंकर यांनी स्पष्ट केलेय म्हणाले.