Defence minister Rajnath Singh on Trump Tariff: अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्के आयातशुल्क लादल्यानंतर त्याचे पडसाद आता उमटू लागलेले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज डोनाल्ड ट्रम्प यांचा चांगलाच समाचार घेतला. ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख न करता ते म्हणाले, “सर्वांचा बॉस आम्हीच आहोत, असे ज्यांना वाटते त्यांना भारताची जागतिक पातळीवर होत असलेली प्रगती पाहावत नाहीये”
मध्य प्रदेशच्या रायसेन येथे बोलत असताना राजनाथ सिंह म्हणाले, “काही लोक आहेत, ज्यांना भारताची वेगाने होत असलेली प्रगती रुचलेली नाही. आम्हीच सर्वांचे बॉस आहोत, मग भारत कशी काय प्रगती करू शकतो? असे त्यांना वाटते. म्हणूनच ते लोक असा प्रयत्न करत आहेत की, भारतात तयार झालेल्या वस्तू जेव्हा विदेशात जातील, तेव्हा त्या महाग कशा होतील, याचा प्रयत्न केला जात आहे. भारतातील लोकांनी तयार केलेल्या वस्तू जेव्हा महाग होतील, तेव्हा त्याची खरेदी होणार नाही. पण मी सांगू इच्छितो भारत वेगाने पुढे जात आहे. भारताला महासत्ता होण्यापासून आता कुणी रोखू शकत नाही.”
भारत रशियाकडून खनिज तेल आयात करतो. भारताने ही आयात थांबवावी, असा इशारा देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अवाजवी, अन्यायकारक अशी टॅरिफ वाढ केली. यामुळे भारतात तयार झालेल्या वस्तू अमेरिकन बाजारात महागात विकल्या जाण्याची भीती आहे. यामुळे भारताऐवजी इतर देशांच्या मालाला महत्त्व प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी भारतात विकसित झालेल्या उत्पादन क्षेत्राची माहिती दिली. ते म्हणाले, “संरक्षण क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली आहे. एकेकाळी आपण बहुसंख्य उपकरणे आयात करत होतो. विमाने, शस्त्र, तंत्रज्ञान किंवा इतर अनेक गोष्टी आपण विदेशातून विकत घेत होतो. पण आज आपण यातील बऱ्याच गोष्टी भारतातच उत्पादित करत आहोतच. पण जगातील इतर देशांनाही आपण त्याची निर्यात करत आहोत.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा २०१४ साली पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते, तेव्हा भारतातून केवळ ६०० कोटींची संरक्षण क्षेत्राशी संबंधित निर्यात होती. पण आज ही निर्यात २४ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. नव्या भारताचे हे नवे संरक्षण क्षेत्र आहे. ही निर्यात वाढतच चालली आहे. आपण आता तंत्रज्ञानही निर्यात करत आहोत”, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी देशाअंतर्गत होणाऱ्या उत्पादनाची माहिती दिली.