अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर जगभरात चर्चा सुरू आहेत. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर गोंधळ माजल्याचं चित्र दिसून येत आहे. तसेच, महिलांचे हक्क आणि त्यांचं संरक्षण याविषयी देखील जागतिक स्तरावरून चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे तालिबानच्या कृत्याचा अनेक देश निषेध करत असताना आणि भारतासाठी तालिबान ही अजूनही दहशतवादी संघटनाच असताना लोकसभेतील एका खासदाराने तालिबानच्या या कृत्याचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, तालिबानची तुलना थेट भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी केली. या प्रकरणी संबंधित खासदार आणि इतर दोन जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही तालिबानची वैयक्तिक बाब?

तालिबानने काबूलवर आपला अंमल प्रस्थापित केल्यानंतर अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्याचं स्पष्ट झालं. या घटनेवर पाकिस्तान, चीन आणि रशियानं अनुकूल प्रतिक्रिया दिलेली असताना जगभरात तालिबान्यांचा निषेधच केला जात आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या संभल मतगारसंघातील समाजवादी पक्षाचे लोकसभेतील ज्येष्ठ खासदार शफीकुर रेहमान बर्क यांनी तालिबान्यांच्या कृतीचं समर्थन करतानाच त्यांची तुलना भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी केली आहे. “जेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा संपूर्ण देश स्वातंत्र्यासाठी लढला होता. त्यांना स्वतंत्र व्हायचं आहे. ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. आपण त्यात हस्तक्षेप कसा करू शकतो?” असं शफीकुर रेहमान म्हणाले होते.

 

“अफगाणींना त्यांचा स्वत:चा देश त्यांना हवा तसा चालवायचा आहे. तालिबानी संघटनांनी रशिया आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांनाही अफगाणिस्तानमध्ये स्थिरावू दिलेलं नाही. आणि आता त्यांना त्यांचा देश स्वत: चालवायचा आहे”, असं देखील शफीकुर रेहमान बर्क म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून आता मोठी टीका केली जाऊ लागली आहे. या विधानासाठी त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते मुकीम आणि फैझान यांच्याविरोधात देखील तालिबानला अनुकूल भूमिका घेतल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भाजपानं दाखल केली तक्रार!

दरम्यान, शफीकुर रेहमान बर्क यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम १२४ अ (देशद्रोह) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाचे उत्तर प्रदेशमधील नेते राजश सिंघल यांनी शफीकुर रेहमान यांच्याविरोधात मंगळवारी तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी दिली आहे.

एकीकडे शफीकुर रेहमान बर्क यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असताना, दुसकीडे त्यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. “मी असं कोणतंही (भारतीय स्वातंत्र्य लढ्याची तालिबानशी तुलना) वक्तव्य केलेलं नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी भारताचा नागरिक आहे, अफगाणिस्तानचा नाही. त्यामुळे तिथे काय घडतंय, याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही. मी माझ्या सरकारच्या धोरणांचं समर्थन करतो”, असं स्पष्टीकरण शफीकुर रेहमान यांनी दिलं आहे.

 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची टीका

शफीकुर रेहमान यांच्या वक्तव्यानंतर खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील त्यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केली होती. “ते निर्लज्जपणे तालिबानचं समर्थन करत होते. याचा अर्थ तालिबान्यांच्या रानटी कारवायांचंच समर्थन करत होते. आपण एक संसदीय लोकशाही आहोत. कुठे चाललोय आपण? मानवतेवर कलंक असणाऱ्या लोकांचं आपण समर्थन करायला लागलोय”, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी शफीकुर रेहमान यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party mp shafiqur rehman barq sedition case compare taliban indian freedom struggle pmw
First published on: 18-08-2021 at 14:49 IST