मणिपूरमध्ये बेपत्ता विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थी आणि स्त्रिया रस्त्यावर उतरल्या. विद्यार्थ्यांच्या एका मोर्चाला हिंसक वळण लागून सुरक्षारक्षकांशी झालेल्या झटापटीत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची घटनाही घडली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच मणिपूरमधील परिस्थिती भयंकर असल्याचं मत व्यक्त केलं.
संजय राऊत म्हणाले, “मणिपूरची परिस्थिती भयंकर आहे. सरकार, गृहमंत्रालय, संरक्षण मंत्रालय, पंतप्रधान या सर्वांचं हे अपयश आहे. विद्यार्थ्यांना गोळ्या झाडून जीवे मारण्यात आलं. सरकार काय करत आहे?”
“मोदी सरकारने नवं संसद भवनात मणिपूरवर चर्चा करू दिली नाही”
“मोदी सरकारने नवं संसद भवन उभारलं, मात्र तेथे आम्हाला मणिपूरवर चर्चाही करू दिली नाही,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“संविधानविरोधी सरकार चालवणारेच लोकशाहीवर प्रवचने झोडतील”
बंडखोर आमदार आणि त्यांच्यावरील अपात्रतेची सुनावणी यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात संविधानाविरोधात, कायद्याविरोधात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाऊन सरकार चालवलं जात आहे. दुसरीकडे हेच लोक आंतरराष्ट्रीय मंचावर लोकशाहीची प्रवचने झोडतील.”
हेही वाचा : मणिपूरमध्ये दोन विद्यार्थ्यांची हत्या, फोटोंमुळे वास्तव समोर; शस्त्रधारी व्यक्तीही फोटोत
“नार्वेकरांचं नाव आधी घानाला जाणाऱ्यांमध्ये नव्हतं”
“मला मिळालेल्या माहितीनुसार, घानात जे शिष्टमंडळ जाणार होतं त्यात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव नव्हतं. मात्र, अपात्रता सुनावणीला उशीर करण्यासाठी आणखी एक कारण हवं म्हणून त्या शिष्टमंडळात त्यांचं नाव टाकून देण्यात आलं. ही आपल्या लोकशाहीची अवस्था आहे आणि हे घानात लोकशाहीवर प्रवचन द्यायला जात आहेत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.