करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा पार करून भारताने गुरुवारी नवा विक्रम नोंदवला. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित केलं. १०० कोटी लसीचे डोस हे केवळ आकडे नाहीत. हे देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. इतिहासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे असं मोदी म्हणाले. मात्र दुसरीकडे शिवसेनेने या १०० कोटींच्या आकड्याबद्दल शंका उपस्थित केलीय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी भाषण देत असतानाच यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं आहे.

१०० कोटी डोस खरोखर पूर्ण झाले आहेत का?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित करतानाच, “झाले असतील तर आनंदच आहे,” असं म्हटलंय.
तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, “डोस देण्याच्या बाबतीत आपला देश जगात १९ व्या स्थानी आहे. काहीजणं म्हणतायत ३३ कोटीच दोन डोस झालेत. तर काहींना दुसरा डोस मिळालाच नाहीय,” असंही म्हटलंय.

पुढे बोलताना राऊत यांनी थेट मोदी सरकावर निशाणा साधलाय. “एखाद्या गोष्टीचा उत्सव करायचं म्हटलं, सेलिब्रेशन करायचं म्हटलं तर या देशात नवा पायंडा पडलाय. तर आपण मोदींच्या या उत्सवात शामील होऊयात. हा एक इव्हेंट सुरु आहे. पण खरोखरच १०० कोटी डोस झाले असेल तर ती गौरवाची बाब आहे,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी नोंदवली आहे.

देशात यंदा १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर पहिल्या दहा कोटी डोस देण्यासाठी ८५ दिवस म्हणजे जवळपास तीन महिने लागले होते. २१ जूननंतर या मोहिमेला गती मिळाली. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून जवळपास नऊ महिन्यांच्या कालावधीत गाठलेला हा यशाचा टप्पा मैलाचा दगड ठरला आहे, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वैज्ञानिकांसह संपूर्ण देशवासीयांचे अभिनंदन केले. या यशानिमित्त मोदी यांनी गुरुवारी राम मनोहर लोहिया रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट देऊन कर्मचारी तसेच काही लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया उपस्थित होते. या कार्यसिद्धीबद्दल मंडाविया यांनी एका ट्वीटद्वारे देशाचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाचा हा परिपाक आहे, असेही मंडाविया म्हणाले.

लसीकरण मोहिमेच्या या यशाबद्दल लाल किल्ला येथे एक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. तिथे एका कार्यक्रमात गौरवगीत आणि चित्रफित प्रकाशित करण्यात आली. देशभरात १०० कोटी मात्रांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे स्वागत करणारी, तसेच करोनायोद्धे व आरोग्य कर्मचारी यांनी या संकटाच्या काळात केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन करणारी घोषणा देशभरातील रेल्वे स्थानकांवर करण्यात आली. केंद्र सरकारच्या काही रुग्णालयांवर बॅनर्स लावण्यात आले. काही रुग्णालयांत कर्मचारी व लसीकरणासाठी आलेल्या लाभार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंदमान व निकोबार बेटे, चंडीगड, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, लक्षद्वीप, सिक्कीम, उत्तराखंड आणि दादरा व नगर हवेली ही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येला लशीची किमान एक मात्रा मिळाली आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत सर्वात जास्त लसमात्रा देण्यात आल्या असून, त्याखालोखाल महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात व मध्य प्रदेश ही राज्ये आहेत.