पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन तासच झोपतात, आता झोप लागू नये यासाठी प्रयत्न करत आहेत असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. कोल्हापुरात बोलताना त्यांनी यानंतर मोदी २४ तास जागे राहतील यासाठी त्यांचे प्रयोग सुरु असल्याचे म्हटलं होते. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हा प्रयोग चांगला आहे. पंतप्रधान मोदींकडे भरपूर काम आहे. उरलेले दोन तासही त्यांना झोपू द्यायचे नाही असं महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांनी ठरवलेले आहे. त्यानुसार भाजपाचे नेते कामाला लागले आहेत. त्यांची शिवसेनेमुळे झोप उडाली आहे. मी दिल्लीत जास्त वेळ असतो. पंतप्रधान मोदी १८ तास काम करतात हे आम्हालाही माहिती आहे. पण महाराष्ट्र भाजपाचे नेते त्यांना जास्तच वर चढवत आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.

वहिनी साहेबांचा आग्रह आम्ही पाळू – संजय राऊत

दरम्यान, गिरिश महाजनांच्या मुलीच्या लग्नाला जमानेरमध्ये दाखल झालेल्या अमृता फडणवीस यांनी लग्नमंडपामध्येच पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊतांना सल्ला दिला होता. संजय राऊतांच्या नागपूर दौऱ्यावर अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. संजय राऊत नागपूरच्या दौऱ्यावर येतातय, असं म्हणत या पत्रकाराने अमृता यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अमृता यांनी, “नागपुरी सावजी (मटण) नक्की खाल, हे मी त्यांना सजेस्ट करु शकते,” असं म्हटलं. त्यावर आता संजय राऊत यांनी वहिनी साहेबांचा आग्रह आहे. वहिनी साहेबांचा आग्रह आम्ही पाळू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

“झोपच लागणार नाही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयोग करत आहेत. आता मोदी दोन तास झोपतात, नंतर ते २४ तास देखील झोपणार नाहीत,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला.

“२०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा अधिक जागा आपल्याला जिंकायच्या आहेत. संसदेत अनेक गोष्टी करायच्या असून त्यासाठी एक तृतीयांश बहूमत पाहिजे. त्यामुळे कामाला लागा. २०२४ मध्ये आपलीच सत्ता आली पाहिजे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction to chandrakant patil statement about pm modi sleep abn
First published on: 21-03-2022 at 22:57 IST