पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय होणारच होता. मात्र दिल्ली महानगरपालिका आणि हिमाचलमध्ये असलेली सत्ता भाजपाने गमावली आहे याबद्दल कोणी चर्चा करत नाही. गुजरातमधील विजयही आपने १३ टक्के मतं मिळवल्याने आधीच्या तुलेनेत अधिक मोठा वाटतोय असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. विरोधक एकत्र आले तर गुजरात आणि उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये भाजपाला फारसं काही करता येणार नाही असाही विश्वास राऊत यांनी ‘सामना’मधील ‘रोखठोक’ सदरातील लेखात व्यक्त केला आहे.

त्यावर कोणीच बोलायला तयार नाही

“राजकारण एक खेळ आहे. चलाख लोक हा खेळ खेळतात. मूर्ख लोक त्यावर दिवसभर चर्चा करतात. सध्या आपल्या देशात यापेक्षा वेगळे काय सुरू आहे? मोदींनी गुजरात जिंकले. या विजयावरच आता चर्चा सुरू आहे. भारतवर्ष एकत्र राहावे म्हणून ‘भारत जोडो’ यात्रेवर राहुल गांधी आहेत. त्याच वेळी देशातील दोन राज्यांच्या विधानसभा व दिल्ली महानगरपालिकेचे निकाल लागले. गुजरात सोडले तर दोन ठिकाणी भाजपाचा मोठा पराभव झाला. भाजपाने गुजरात जिंकले त्यात नवल ते काय? मोदींचे गुजरात दुसरे कोण जिंकणार? गुजरातमधील प्रत्येक प्रचारसभेत नरेंद्र मोदी सांगत होते, ‘‘हे गुजरात माझे आहे. हे गुजरात मी बनवले आहे,’’ अशी भावनिक साद व काँग्रेसचे संघटनात्मक फोलपण यामुळे गुजरातवर भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याच वेळी भारतीय जनता पक्षाने जे गमावले त्यावर कोणीच बोलायला तयार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
Nepotism in four out of ten Lok Sabha constituencies in Vidarbha by all political parties including bjp
विदर्भातील सर्वपक्षीय घराणेशाही, भाजपही मागे नाही

हा मूर्खपणाच आहे

“भाजपाने राजधानी दिल्लीतील 15 वर्षांची सत्ता गमावली. दिल्ली महानगरपालिकेत भाजपा पराभूत झाली. देशाच्या राजधानीतला हा पराभव. त्याच वेळी भाजपाची सत्ता असलेले हिमाचल प्रदेश गमावले. काँग्रेसने येथे पूर्ण बहुमत मिळवून भाजपाची सत्ता खेचून घेतली. म्हणजे तीन सामन्यांत भाजपा फक्त एके ठिकाणी, गुजरातमध्येच जिंकला. अन्य दोन ठिकाणी ते पराभूत झाले. मोदी-शाहांची जादू आपल्या गृहराज्यात चालली, पण प्रत्यक्ष दिल्लीत व हिमाचल प्रदेशात चालली नाही. याआधी ती पंजाबमध्येही अजिबात चालली नाही, पण भाजपा फक्त विजयाचा उत्सव साजरा करतो. त्या उत्सवात पराभवाची चर्चा करणे लोक विसरतात. हा मूर्खपणाच आहे,” असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

सामना बरोबरीत सुटला

“भाजपाच्या उद्याच्या राजकारणाचे चित्र या तीन निर्णयांनी स्पष्ट झाले आहे. त्याचा विचार आपण सर्वांनीच करावयास हवा. गुजरात हा अपवाद आहे. पण काँग्रेस जिवंत आहे व अनेक राज्यांतील मतदार काँग्रेसकडे पर्याय म्हणून पाहतात हे हिमाचलसारख्या राज्यात दिसून आले. दिल्लीच्या मनपा निवडणुका भाजपाने प्रतिष्ठेच्या केल्या. तरीही ‘आप’ने तेथे १३४ जागा जिंकून भाजपावर झाडू फिरवला. येथे काँग्रेस नावालाही उरली नाही. पण काँग्रेस व आप एकत्र आले असते तर आप व काँग्रेसने मिळून दोनशे जागा जिंकल्या असत्या. दिल्लीत एकेकाळी काँग्रेसचा जोर होता व शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिंकत होती. आज काँग्रेसकडे दिल्लीत नेता नाही. आश्चर्य असे की, जे ‘मोदी-शाह’ देश जिंकण्यासाठी चाणक्य नीती अवलंबतात ते प्रत्यक्ष दिल्लीची विधानसभा व महानगरपालिका जिंकू शकले नाहीत. प्रियंका, राहुल, सोनिया गांधी दिल्लीत असूनही तेथील महानगरपालिकेत १५ जागा काँग्रेसला जिंकता आल्या नाहीत. मोदींनी गुजरात जिंकले, केजरीवाल यांनी दिल्ली आणि काँग्रेसने हिमाचल जिंकले! सामना बरोबरीत सुटला,” असं निरिक्षण राऊतांनी नोंदवलं.

मुख्यमंत्री व पंतप्रधान म्हणून मोदी यांनी गुजरातला आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या प्रबळ केले

हिंदू मतदानाच्या मुद्द्यावरही राऊत यांनी भाष्य केलं आहे. “गुजरातमध्ये भाजपाने १५६ जागा जिंकल्या. हा आतापर्यंतचा गुजरातमधील विक्रम आहे. गुजरातमध्ये मतदान हे सरळ सरळ हिंदू विरुद्ध मुसलमान असेच झाले. गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रचारसभेतील भाषणे काळजीपूर्वक पाहिली तर गोध्रा प्रकरणात अप्रत्यक्षपणे काय केले यावरच त्यांचे विवेचन असे. १९९२ च्या मुंबईतील दंगलीत शिवसेनेने हिंदू रक्षणासाठी जी भूमिका बजावली तीच भूमिका गुजरातेत बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने बजावली. मोदी हे तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, पण पुढे मुख्यमंत्री व पंतप्रधान म्हणून मोदी यांनी गुजरातला आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या प्रबळ केले. मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र त्यांनी सरळ गुजरातेत नेले. डायमंड हबही नेले. अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रातून नेले व गुजरातची भरभराट केली,” असं राऊत म्हणतात.

सवाशे वर्षांच्या काँग्रेसला लोक मरू देत नाहीत

“मोदी हे पंतप्रधान म्हणून फक्त गुजरातचेच हित पाहत आहेत, अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली तरी ‘मी प्रथम गुजराती’ ही भूमिका त्यांनी सोडली नाही. गौतम अदानी यांच्यामागे ते ठामपणे उभे राहिले व त्यांना जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत बनवले. ते गौतम अदानी हे गुजराती तरुणांचे आज ‘हीरो’ आहेत व काँग्रेस अदानी यांच्या विरोधात मोहिमा राबवत राहिली. अदानी व मोदींवरील टीकेचा काहीही उपयोग आप आणि काँग्रेसला झाला नाही. मोदींमुळे भाजपाला गुजरातमध्ये हरवणे कठीण आहे. याचा अर्थ इतर राज्यांत भाजपा अजिंक्य आहे असा नाही. हिमाचल व दिल्लीने ते दाखवून दिले. सवाशे वर्षांच्या काँग्रेसला लोक मरू देत नाहीत. ती या किंवा त्या राज्यात जिवंत होत असते. पंजाबचे राज्य गेले, पण बाजूच्या हिमाचल प्रदेशात काँग्रेस जिवंत झाली. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेने ती अधिक ऊर्जावान होईल,” असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

विरोधक एकत्र झाले तर…

इतर राज्यांत भाजपाची जादू का चालली नाही? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे. “मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातेत भाजपास घवघवीत यश मिळाले. मोदी हे मोठे नेते आहेत व आता ते जागतिक ‘जी 20’ गटाचे अध्यक्ष झाल्याचा प्रचार गुजरात निवडणुकीत झाला. पण हे घवघवीत यश हिमाचल व दिल्लीत का मिळाले नाही? याचा विचार विरोधकांनी एकत्र येऊन करायला हवा. उद्या निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश, कर्नाटक ही दोन्ही राज्ये काँग्रेस सहज जिंकेल. महाराष्ट्र तर भाजपाने गमावला आहे. प. बंगाल, पंजाबात मोदी नाहीत. बिहारचे चित्र वेगळे दिसेल. लालू यादव हे किडनी बदलानंतर बरे होऊन सक्रिय होतील. फक्त उत्तर प्रदेश व गुजरात या दोन राज्यांवर भाजपा भरवसा ठेवू शकेल. पण विरोधक एकत्र झाले तर या दोन राज्यांचाही फार प्रकाश पडणार नाही,” असं राऊत यांचं म्हणणं आहे.

…पण चर्चा फक्त गुजरातची

“झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड ही राज्ये लहान असली तरी बदल घडवू शकतील. २०२४ साली राममंदिर पूर्ण होईल व तो मुद्दा प्रचारात येईल. पुन्हा समान नागरी कायद्याचे शंख फुंकायला सुरुवात झाली आहेच. कर्नाटक विधानसभा जिंकायच्या म्हणून सीमावादाने उग्र रूप धारण केले आहे. महाराष्ट्र तोडण्याचे षड्यंत्र रचून केंद्र कर्नाटकास फूस लावत आहे. शेवटी निवडणुका जिंकण्यासाठी जनतेचे, राष्ट्राचे नव्हे तर हेच विषय समोर आणले जातात. गुजरातेत वेगळे काय झाले? काँग्रेस आपला अपमान व अवहेलना करीत असल्याचे मोदी बोलत राहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी येई. गुजराती लोक त्या पाण्यात विरघळून गेले. मोरबीच्या दुर्घटनेचा आक्रोश त्यात वाहून गेला. अशा वेळी पंतप्रधान मोदी नेहमीच जिंकतात! तसेच ते या वेळीही गुजरातेत जिंकले. गुजरातचा विजय मोठाच, पण हिमाचल, दिल्लीचा पराभवही तितकाच मोठा! पण चर्चा फक्त गुजरातची सुरू आहे,” असा टोला राऊतांच्या ‘रोखठोक’ या लेखातून लगावला आहे.

पोटनिवडणुकांतही विरोधकांना चांगले यश

“शिवसेनेसह सर्व प्रादेशिक पक्ष संपवून टाकू, अशी भाषा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. पण त्यांचे स्वतःचे राज्य ‘हिमाचल’ येथेच भाजपाचा दारुण पराभव झाला. लोकांना गृहीत धरू नका, हा धडा महत्त्वाचा. गुजरातेत ‘आप’ने काँग्रेसची १३ टक्के मते खेचली. ‘आप’ला अवघ्या पाच जागा मिळाल्या. पण १३ टक्के मतांमुळे ‘आप’ आता राष्ट्रीय पक्ष होईल. यावरच ते लोक खूश. काँग्रेसचे पाय त्यामुळे कापले व भाजपाचा मोठा विजय झाला. गुजरातेत काँग्रेस किमान पन्नास जागांचा टप्पा गाठेल असे वाटत होते. पण ‘आप’ने भाजपाला मोठ्या विजयाची संधी दिली. उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील पोटनिवडणुकांतही विरोधकांना चांगले यश मिळाले. पण तरीही चर्चा फक्त गुजरातचीच. गुजरात जिंकणारच होते. हिमाचल, दिल्लीत लोकांनी का नाकारले, यावरही चर्चा होऊ द्या,” असं राऊत म्हणाले.