Pakistani Beggars News : सौदी अरबने गेल्या वर्षीच्या जानेवारीपासून ते आतापर्यंत ५,०३३ पाकिस्तानी भिकाऱ्यांची स्वगृही हकालपट्टी केली आहे. पाकिस्तानी संसदेत गृहमंत्री मोहसीन नकवी यांनी ही माहिती मांडली आहे. नकवी केवळ सौदी अरबमधून मायदेशी आलेल्या भिकाऱ्यांबाबतची आकडेवारी देऊन थांबले नाहीत. इतर मुस्लीम राष्ट्रांनी हकालपट्टी केलेल्या भिकाऱ्यांबाबतची माहिती देखील त्यांनी संसदेत दिली. मोहसीन नकवी म्हणाले, “अनेक पाकिस्तानी नागरिक मलेशिया, इराक, संयुक्त अरब अमिराती (यूएई), ओमान व कतारसारख्या देशात भीक मागण्यासाठी जातात.
गृहमंत्री नकवी म्हणाले, “आपल्या देशातील गरीब लोक इतर मुस्लीम राष्ट्रांमध्ये भीक मागण्यासाठी जात आहेत. या लोकांना वाटतं की ही सगळी (इराक, कतार, ओमान, मलेशिया, यूएई) श्रीमंत मुस्लीम राष्ट्रे आहेत. इथे जाऊन भीक मागून आपला केवळ उदरनिर्वाहच होणार नाही तर आपली आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकते”. सौदी अरब दर वर्षी हजारो पाकिस्तानी भिकाऱ्यांना परत पाठवतो. त्यांनी पाकिस्तानी सरकारला आवाहन केलं होतं की हा सगळा प्रकार थांबवावा. तुमच्या देशातून भिकारी पाठवू नका असं स्पष्ट बजावलं होतं.
१६ महिन्यात ५,४०२ भिकाऱ्यांना परत पाठवलं
मंत्री मोहसीन नकवी म्हणाले, सौदी अरब, इराक, मलेशिया, ओमान, कतार व यूएईने तब्बल ५,४०२ भिकाऱ्यांना परत पाठवलं आहे. ही गेल्या १६ महिन्यांमधील आकडेवारी आहे. गेल्या चार महिन्यांत या देशांनी ५५२ भिकारी परत पाठवले आहेत.
पाकिस्तानमधील शेकडो लोक भीक मागण्यासाठी प्रामुख्याने सौदी अरबला जातात. कारण या देशांत मक्का व मदीना ही मुस्लिमांची सर्वात मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. सौदी अरबला गेलेले भिकारी मक्का व मदीना परिसरात भिक मागतात. तीर्थयात्रेसाठी गेलेले लोक त्यांना भीक देतात. अनेक पाकिस्तानी भिकारी केवळ मक्का-मदीना परिसात भीक मागून श्रीमंत झाले आहेत. हे पाहून अलीकडच्या काळात पाकिस्तानमधील हजारो नागरिक भीक मागण्यासाठी सौदी अरबसह इतर मुस्लीम राष्ट्रांमध्ये जाऊ लागले आहेत. यावर सौदी अरब सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
भीक मागण्यासाठी पाकिस्तानमधून इतर देशांमध्ये गेलेल्या लोकांपैकी २,४२८ भिकारी हे एकट्या सिंध प्रांतातील आहेत. त्यापाठोपाठ पंजाबमधील १,०९८ व खैबर पख्तूनख्वामधील ८१९ जणांचा समावेश आहे.