देशातील सगळ्यात मोठी व्यापारी बँक असा लौकिक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI नं बचत खात्यांवरचं व्याज ०.५ टक्क्यांनी कमी केलं आहे. १ कोटी रूपयांपर्यंतची रक्कम ज्या बचत खात्यांवर जमा आहे त्या सगळ्या खात्यांच्या व्याजात ०.५ टक्क्यांची कपात होणार आहे. बचत खात्यांवर असलेल्या १ कोटींपेक्षा जास्त रकमेसाठी ४ टक्के व्याजदर आहे त्यात काहीही बदल होणार नाहीये. मात्र १ कोटी रूपयांच्या आतल्या रकमेवर आता ३.५ टक्के व्याज मिळणार आहे.

बचत खात्यांच्या बाबतीत हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती एसबीआयनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सोमवारी दिली आहे. सध्याच्या घडीला एसबीआयच्या ९० टक्के खात्यांमध्ये १ कोटी किंवा त्याच्या आतल्याच रकमा आहेत. शेअर बाजार तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञांनी एसबीआयच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे. एसबीआयनं घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचा मोठा नफा होणार आहे असं मत अर्थविषयक अभ्यासकांनी मांडलं आहे. व्याजदर घटविले जाण्याची घोषणा एसबीआयतर्फे करण्यात येते त्यानंतर इतर बँकांकडून दर घटविले जातात.

एसबीआयनं केलेल्या घोषणेनंतर त्यांच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची उसळी बघायला मिळाली एसबीआयचे शेअर्स आज ३१२ रूपये ६५ पैशांवर आले आहेत. महागाईचा दर घसरल्यानं बचत खात्यांच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे असं एसबीआयनं म्हटलं आहे.

चालू खातं म्हणजेच करंट अकाऊंट आणि बचत खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रकमा आहेत. त्यामुळे आम्ही व्याजदरात कपात केली आहे याचा फायदा लघू आणि मध्यम उद्योगांच्या कर्जासाठी, कृषी कर्जासाठी आणि घर खरेदीसाठी घेण्यात येणाऱ्या गृहकर्जासाठी होणार आहे असं बँकेनं म्हटलं आहे. २ ऑगस्ट रोजी आरबीआयकडूनही व्याजदरांमध्ये आणखी कपात केली जाण्याची शक्यता आहे असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.