बलात्काराचा आरोप असलेले ‘तेहलका’चे संस्थापक संपादक तरूण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. तेजपाल यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आणि उर्वरित विधी करण्यासाठी तेजपाल यांना तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
तेजपाल यांच्या मातोश्रींचे रविवारी गोव्यात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. बी. एस. चौहान आणि न्या. ए. के. सिक्री यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. तेजपाल यांच्यावर सहकारी महिलेवर बलात्कार केल्याचा आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर रोजी तेजपाल यांना गोवा पोलीसांनी अटक केली होती. तेव्हापासून ते कोठडीतच आहेत.