हॉटेल आणि अन्य खानपान केंद्रांवर तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री व सेवनावर महाराष्ट्रासह काही राज्यांनी आणलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उठवली. त्यामुळे मुंबईतील हुक्कापार्लर पुन्हा खुले होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादनांच्या विक्रीसंदर्भातील २००३च्या कायद्याच्या अंमलबजावणीचे आदेश देताना मुंबई, मद्रास आणि गुजरात उच्च न्यायालयांनी तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर कडक बंधने आणण्याचे आदेश महापालिकांना दिले होते. त्यानुसार मुंबई तसेच अन्य शहरांतील हॉटेले आणि खानपान केंद्रांवर सिगारेट सेवन आणि विक्रीवर बंदी आणण्यात आली होती. मात्र, ही अट चुकीची आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. रंजन गोगोई आणि आर. एफ. नरिमन यांच्या पीठाने व्यक्त केले. ‘सिगारेट विक्री संदर्भातील कायद्याच्या कलम सहानुसार, १८ वर्षांखालील व्यक्ती आणि शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्डाच्या परिसर वगळता अन्यत्रे कोठेही तंबाखूजन्य पदार्थ विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा स्थितीत महापालिकेने परवाना दिलेल्या विक्रेत्याला सिगारेट विकण्यास बंदी आणणे कायद्याच्या विरोधात जाणारे आहे.
हुक्क्याचा सुळसुळाट
मुंबई:हॉटेल मध्ये हुक्का पिण्यावर उच्च न्यायालयाने अंशत: घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये ध्रुम्रपान करण्यावर बंदी आहे त्याचप्रमाणे हुक्का पिण्यास बंदी आहे. हॉटेलमध्ये हुक्का पिण्यासाठी स्वतंत्र कक्ष असणे आवश्यक करण्यात आले होते. हुक्का मध्ये तंबाखू असल्याने आरोग्याला हानीकारक तसेच इतर ग्राहकांना धुराचा त्रास होत असल्याने ही बंदी होती. हुक्का पिणारा आढळल्यास त्याच्यावर तंबाखू विरोधी कायद्यानुसार दंडाची तर हॉटेल चालकावर नियमभंगाची कारवाई करण्यात येत होती. आता बंदी उठल्याने हुक्काचा सुळसुळाट होण्याची शक्यता आहे.