Scotch Whisky To Become Cheaper After India UK FTA: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान गुरुवारी भारत आणि इंग्लंडने ऐतिहासिक अशा मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. इंग्लंडचे पंतप्रधान कीअर स्टार्मरही उपस्थित होते. सुमारे तीन वर्षांपासून वाटाघाटी सुरू असलेल्या या मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारात दरवर्षी सुमारे ३४ अब्ज डॉलर्सची वाढ होणार आहे. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि इंग्लंडचे वाणिज्य मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

या ऐतिहासिक करारामुळे, युकेमधून भारताला आयात होणाऱ्या अनेक उत्पादनांवर शुल्क कपात होणार आहे. तसेच भारतातील निर्यात व्यवसायांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.

वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले की, “या करारामुळे सुमारे ९९% भारतीय निर्यातीवरील शुल्क माफ होणार आहे. कामगार-केंद्रित क्षेत्रांसाठी सुमारे २३ अब्ज डॉलर्सच्या संधी उपलब्ध होतील.”

भारतीयांसाठी कोणत्या वस्तू स्वस्त होतील?

  • ब्रिटनमधील स्कॉच व्हिस्की आणि लक्झरी कार भारतीयांसाठी स्वस्त होतील. भारताने पुढील १० वर्षांत स्कॉच व्हिस्की आणि जिनवरील कर १५० टक्क्यांवरून ७५ टक्के आणि पुढे ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास सहमती दर्शवली आहे.
  • सध्या १०० टक्क्यांहून अधिक असलेला यूके-निर्मित कारवरील आयात कर, कोटा प्रणाली अंतर्गत १० टक्क्यांपर्यंत कमी होईल.
  • भारतातील वाढत्या ग्राहक बाजारपेठेतील प्रवेशामुळे डियाजिओ (स्कॉच व्हिस्की) आणि अ‍ॅस्टन मार्टिन व जग्वार लँड रोव्हर सारख्या ब्रिटिश लक्झरी कार उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा होईल.
  • भारत सौंदर्यप्रसाधने, सॅल्मन, चॉकलेट, वैद्यकीय उपकरणे आणि बिस्किटे यांसारख्या उत्पादनांवरील शुल्क देखील काढून टाकेल किंवा कमी करेल. यामुळे या सर्व वस्तू भारतीयांना स्वस्तात खरेदी करता येणार आहेत.

डियाजिओचे (स्कॉच व्हिस्की) अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी निक झांगियानी म्हणाले, “हा करार स्कॉच आणि स्कॉटलंड दोघांसाठीही एक उत्तम क्षण आहे आणि ज्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली आहे, त्यांच्यासाठी आम्ही जॉनी वॉकरचा ग्लास उचलून ‘चिअर्स’ करणार आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यापार कराराचे इतर फायदे

तसेच, या व्यापार करारामुळे भारतीयांना यूकेमध्ये राहणे अधिक परवडणारे होणार आहे. भारतीय कंपन्या आणि फ्रीलांसरांना यूकेमधील ३६ सेवा क्षेत्रांमध्ये ‘इकोनॉमिक नीड टेस्ट’ शिवाय प्रवेश मिळेल. भारतीय व्यावसायिक, कार्यालय नसले तरीही, २४ महिने यूकेच्या ३५ क्षेत्रांमध्ये काम करू शकतात. या करारानुसार भारतीय व्यावसायिकांना तीन वर्षांसाठी यूकेच्या सोशल सेक्युरिटी पेमेंटमधून सूट दिली जाईल.