ज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचं रविवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. मागील दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेठमलानी यांच्या पश्चात मुलगा वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार असून, मुलगी अमेरिकेत राहते. त्यांची दुसरी मुलगी राणी जेठमलानी यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ विधिज्ज्ञ आणि कायद्याचा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाचे खटले लढले. त्यापैकी काही महत्त्वाच्या खटल्यांबद्दल जाणून घेऊया.

  • राम जेठमलानी हे १९५९ मधील के.एम.नानावटी विरूद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यानंतर प्रकाशझोतात आले. त्यांनी यशवंत चंद्रचूड यांच्यासोबत हा खटला लढवला होता.
  • माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांचे मारेकरी सतवंत सिंह आणि केहर सिंह यांच्या बाजूनं कोणत्याही वकीलानं खटला लढण्यास नकार दिला होता. त्यानंतर जेठमलानी यांनी पुढाकार घेत त्यांच्या बाजूने खटला लढवला.
  • माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचे आरोपी वी. श्रीहरन याच्या बाजूनेही ते सर्वोच्च न्यायालयाच लढले होते. २१ मे १९९१ रोजी चेन्नई जवळील श्रीपेरुबुदूरमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात राजीव गांधी यांच्यासह १९ जणांचा मृत्यू झाला होता.
  • सोराबुद्दीन प्रकरणात अमित शाह यांच्या बाजूने जेठमलानी खटला लढवला होता.
  • तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचा खटलाही त्यांनी न्यायालयात लढला होता. जयललिता यांच्यावर उत्पन्नापेक्षा ६६.६५ कोटी रूपयांची अधिक संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला होता.
  • तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांची कन्या आणि खासदार कनिमोझी यांचा खटलाही लढला होता. कनिमोझी यांच्यावर २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात २१४ कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.
  • सुरूवातीच्या काळात त्यांनी कृष्णा देसाई यांच्या हत्येच्या प्रकरणात शिवसेनेकडून खटला लढवला होता.
  • याव्यतिरिक्त त्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे वकील म्हणून चारा घोटाळा प्रकरणी २०१३ मध्ये काम पाहिले होते.
  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने जेठमलानी यांनी माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याविरोधात मानहानीचा खटला लढला होता. त्यांनंतर खटल्याच्या फी वरून आरोप प्रत्यारोपही झाले होते.
  • संसदेवर हल्ला केलेल्या अफजल गुरूचाही खटला जेठमलानी यांनी लढला होता. त्यांनी अफजल गुरूला देण्यात आलेली फाशीची शिक्षा कमी करण्याची मागणी केली होती. तसेच त्यांनी अफजलला आपल्या मर्जीनुसार वकील उपलब्ध करून न दिल्याचा आरोप सरकारवर केला होता.
  • मुंबईचा डॉन हाजी मस्तानचे स्मगलिंगशी निगडीत अनेक खटले जेठमलानी यांनी लढले होते.
  • जेसिका लाल हत्याप्रकरणात मनू शर्माकडून जेठमलानी यांनी खटला लढवला होता.
  • शेअर बाजार प्रकरणी हर्षद मेहता आणि केतन पारेख यांच्या बचावासाठी ते न्यायालयात हजर झाले होते.
  • २०१३ मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे आरोपी आसाराम बापूंच्या खटल्यात त्यांच्या बाजूने ते वकील म्हणून उपस्थित होते.
  • सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्याबाजूने ते सर्वोच्च न्यायालयात खटला लढले होते.