कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला करण्यात आलेली अटक म्हणजे पाकिस्तानचं ढोंग असल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी भारताने सावध राहिलं पाहिजे असा सल्लाही दिला आहे. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. हाफिज सईद लाहोरहून गुजरांवाला येथे जात असताना दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली. हाफिजला अटक करुन तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उज्ज्वल निकम यांनी हाफिज सईदच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “हे भारताच्या कुटनीतीचं यशस्वी पाऊल आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधातील जे पुरावे सादर केले त्यामुळे पाकिस्तानचा नाईलाज झाला आणि त्यांनी कारवाई केली. पण हे पाकिस्तानचं ढोंग वाटत आहे. त्यामुळे भारताने सावध राहिलं पाहिजे”.

“हाफिज सईदला अटक केल्याचं सांगत जगाची फसवणूक करत आहे. पण ते न्यायालयात काय पुरावे सादर करतात आणि त्याला दोषी सिद्ध करण्यासाठी किती प्रयत्न करतात हे पहावं लागेल. अन्यथा हे नाटक आहे”, असंही उज्ज्वल निकम यांनी सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी पंजाब प्रांतातील पोलिसांनी हाफिज सईद विरोधात दहशतवादाला पैसा पुरवणे आणि आर्थिक गैरव्यवहार या आरोपांखाली एफआयआर दाखल केला होता. त्याचवेळी त्याला अटक होणार अशी चर्चा होती. हाफिजने फक्त मुंबईवरच नव्हे तर देशाच्या वेगवेगळया भागात दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. पाकिस्तानच्या हाफिजविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या कृतीवर हा सर्व डोळयात धुळफेक करण्याचा प्रकार असल्याचे भारताने म्हटले होते. दहशतवादी कायद्याखाली पाकिस्तान सरकारने २०१७ साली हाफिज सईद आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. पण ११ महिन्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

पाकिस्तान त्यांच्या भूमीवरील दहशतवाद्यांविरोधात ठोस, सत्याच्या कसोटीवर टिकणारी कारवाई करेल त्यावेळी त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल विचार करता येईल. काही वेळा आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्यासाठी अशी कारवाई केली जाते असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले होते. सईदला यापूर्वी सुद्धा पाकिस्तानात अटक झाली होती. पण ती दाखवण्यापुरतीची कारवाई असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. पाकिस्तानवर मोठया प्रमाणात आंतरराष्ट्रीय दबाव आहे. त्यामुळे हाफिज विरोधात ही कारवाई करावी लागली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior lawyer ujjwal nikam on jamatud dawas hafiz saeed arrest pakistan sgy
First published on: 17-07-2019 at 13:28 IST