‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानाच्या पोस्टरवर झालेल्या एका चुकीमुळे जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मुफ्ती महबूबा यांची नाचक्की झाली आहे. जम्मू काश्मीर सरकारच्या अनंतनागमधील सरकारी कार्यक्रमाच्या पोस्टरवर फुटीरतावादी नेत्या असिया अंद्राबी यांचे छायाचित्र आहे. अंद्राबी ‘दुख्तरान-ए-मिल्लत’ संघटनेच्या प्रमुख आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरवर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांचीही छायाचित्रे आहेत. अशा दिग्गज व्यक्तींसोबत असिया अंद्राबी यांचे छायाचित्र लावण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजप यांची सत्ता आहे. त्यामुळेच या संपूर्ण घटनेबद्दल भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. जम्मू काश्मीर सरकारकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवरुन ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा संदेश देण्यात येत आहे. यासाठी पोस्टरवर माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, भारतरत्न लता मंगेशकर, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, टेनिसपटू सानिया मिर्झा, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती, नोबेल पुरस्कारप्राप्त समाजसेविका मदर तेरेसा, अंतराळवीर कल्पना चावला यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. या दिग्गज व्यक्तीमत्त्वांसोबत फुटीरतावादी नेत्या असिया अंद्राबी यांचे छायाचित्र लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

‘एकीकृत बाल विकास सेवा’कडून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा संदेश देण्यासाठी अनंतनागमध्ये पोस्टर लावण्यात आले आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘एकीकृत बाल विकास सेवा’ विभाग सामाजिक कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. भाजपचे सज्जाद लोण या खात्याचे मंत्री आहेत. कोकरनागमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी हे पोस्टर लावण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्य सरकारचे अधिकारी आणि मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींचे भाऊ तसादूक मुफ्ती हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

असिया अंद्राबी ‘जमात-उद-दावा’चा प्रमुख हाफिज सईदच्या संपर्कात असल्याचे वृत्त अनेकदा समोर आले आहे. अंद्राबी आणि हाफिज सईद कायम फोनवरुन संपर्कात असतात. अंद्राबी यांना पोलिसांनी अनेकदा बेकायदा कृत्यांमध्ये अटक झाली आहे. काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचे कृत्य अंद्राबी यांनी अनेकदा केले आहे. यासोबत देशविरोधी कारवाया केल्याचा आरोपदेखील त्यांच्यावर आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Separatist asiya andrabis photo in beti bachao beti padhao poster in jammu and kashmir
First published on: 12-10-2017 at 11:34 IST