येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर गंभीर आरोप केलाय. प्रियंका गांधी यांच्याकडील चित्रकार एम. एफ. हुसेन यांची २ कोटी रुपयांची पेटिंग खरेदी करण्यासाठी माझ्यावर दबाव आला होता, असा आरोप राण कपूर यांनी ईडीसमोर दिलेल्या जबाबात केलाय. ईडीने विशेष न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, पेंटिंगच्या विक्रीतून आलेले २ कोटी रुपये काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या न्यू यॉर्कमधील उपाचारासाठी वापरण्यात आल्याचा दावाही राणा यांनी केलाय.

राणा कपूर ईडीसमोर म्हणाले, “तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी म्हटलं होतं की प्रियंका गांधी यांच्याकडील चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्याकडील पेटिंग खरेदी करण्यास नकार दिल्यास गांधी कुटुंबासोबत चांगले संबंध तयार करण्यास अडचण येईल. तसेच पद्मभूषण पुरस्कार मिळण्यातही अडसर येईल.”

“पेटिंगच्या खरेदीचे पैसे सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय उपचारासाठी वापरले”

“यानंतर मी या पेटिंगसाठी २ कोटी रुपयांचा चेक दिला. या पेटिंगच्या खरेदीचे पैसे सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय उपचारासाठी वापरण्यात आल्याचं मुरली देवरा यांचा मुलगा मिलिंद देवरा यांनी खासगीत सांगितलं होतं,” असं राणा कपूर यांनी सांगितलं.

ईडीकडून मनी लाँड्रिंगप्रकरणी कपूर कुटुंबाविरोधात आरोपपत्र

ईडीने येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर, त्यांचं कुटुंब, डीएचएफएलचे प्रमोटर कपिल आणि धीरज वाधवान यांच्यासह काही लोकांवर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत विशेष न्यायालयात ३ पुरवणी आरोपपत्र दाखल केलेत. त्यातील दुसऱ्या आरोपपत्रात हे आरोप केले आहेत.

“पेटिंग खरेदीमुळे पद्मभूषण पुरस्कारासाठी उपयोग होईल”

राणा कपूर पुढे म्हणाले, “सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी गांधी कुटुंबाला योग्य वेळी पाठिंबा देत चांगलं काम केल्याचं मला सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अहमद पटेल यांनी सांगितलं. तसेच यामुळे माझा पद्मभूषण पुरस्कारासाठी उपयोग होईल, असंही सांगण्यात आलं.”

हेही वाचा : उत्तर प्रदेशात पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्याचा लेटर बॉम्ब; प्रियंका गांधींच्या राजीनाम्याची केली मागणी

“मी तयार नसलेल्या खरेदीसाठी माझ्यावर जबरदस्ती”

“मी तयार नसलेल्या खरेदीसाठी माझ्यावर जबरदस्ती करण्यात आली. मिलिंद देवरा यांनी यासाठी अनेकदा मला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल, मेसेज केले. माझ्या घरी आणि कार्यालयाला भेट दिली. मला ही खरेदी करायची नव्हती. त्यामुळे मी मिलिंद देवरा यांचे फोन घेतले नाही, मेसेजला रिप्लाय दिला नाही आणि व्यक्तिगत भेट घेणंही टाळलं होतं,” असाही दावा राणा कपूर यांनी केलाय.