पीटीआय, मैनपुरी (उत्तर प्रदेश)

चेंगराचेंगरीच्या भीषण दुर्घटनेनंतर बाबा नारायण हरी ऊर्फ सक्कर विश्व हरी भोलेबाबा याच्या येथील आश्रमाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाबाच्या ठावठिकाणाबाबत अधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगले आहे. तो आश्रमातच असल्याचे काही पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. या बाबाच्या हाथरस येथील सत्संगावेळी चेंगराचेंगरी होऊन १२१ जणांचा बळी गेला, तर ३१ जण जखमी झाले.

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आश्रमाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आल्याचे अधिकारी सुनील कुमार सिंह यांनी नमूद केले. मात्र बाबा आश्रमात आहे काय? याचे उत्तर त्यांनी दिले नाही.

अहवालात काय?

दोन लाखांहून अधिक नागरिक मंडपात उपस्थित होते. भोलेबाबा हा दुपारी साडेबारा वाजता घटनास्थळी दाखल झाला. एक तास हा कार्यक्रम सुरू होता. दुपारी १.४० च्या सुमारास बाबा मंडपातून बाहेर येऊन इटावाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाकडे जात होता. त्याच वेळी भाविक त्याच्या दिशेने पळाले तसेच बाबा जात असलेली जमिनीवरील माती माथ्याला लावण्यासाठी पळापळ करू लागले असे अहवालात नमूद केले आहे. अधिकाधिक नागरिक महाराजाच्या वाहनाच्या दिशेने पळू लागल्यावर परिस्थिती गंभीर झाली. बाबाच्या सुरक्षा रक्षकांनी नागरिकांना मागे ढकलले. त्यामुळे काही नागरिक खाली पडले. खुल्या मैदानात जाण्यासाठी नागरिक धावपळ करू लागले. यातून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मैदान निसरडे असल्याने नागरिक घसरून पडले. जे नागरिक पडले ते पुन्हा उठू शकले नाहीत असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>केजरीवाल यांच्या जामिनावर उद्या सुनावणी; बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्याचा वकिलांचा दावा

प्रियंका यांची टीका

अशा घटना वारंवार घडतात, मात्र सरकार कोणावर जबाबदारी निश्चित करत नाही, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपवर केली. हाथरसच्या घटनेत परवानगीपेक्षा अधिक संख्येने नागरिक घटनास्थळी होते. वैद्याकीय मदत, रुग्णवाहिका अशी कोणतीही व्यवस्था येथे नव्हती, असा आरोपही त्यांनी समाजमाध्यमावरून केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयीन चौकशीची घोषणा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अशा कार्यक्रमांना परवानगी देताना नियमावली करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून या घटनेची चौकशी केली जाईल. सरकारने विशेष तपास पथक स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली. भोलेबाबाचे नाव गुन्ह्यात नसल्याबद्दल विचारता, आदित्यनाथ यांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. या घटनेमागे षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या घटनेत २८ जण जखमी झाले. मृतांमध्ये अजून चौघांची ओळख पटली नाही. मंगळवारच्या या दुर्घटनेत ११६ मृतांपैकी सात मुले व एक पुरुष व्यक्ती वगळता अन्य महिला आहेत.