पीटीआय, सिवान

बिहारच्या सिवान जिल्ह्यातील गंडकी नदीवरील पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या १५ दिवसांत बिहारमधील पूल कोसळण्याची ही ७वी तर सिवान जिल्ह्यातील गेल्या ११ दिवसांतील ही दुसरी घटना ठरली आहे.

सिवान जिल्ह्यातील देवारिया भागातील गंडकी नदीवरील हा छोटा पूल अनेक गावांना महाराजगंजशी जोडतो. उपविकास आयुक्त मुकेश कुमार यांनी सांगितले की, घटनेनंतर या भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पुलाची पाहणी केली. या घटनेची चौकशी केली जात आहे. सकाळी ५च्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या पुलाची उभारणी १९८२-८३ मध्ये झाली होती. त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. त्यातच मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाहातील पाण्यामुळे पुलाची रचना कमकुवत होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली होती. त्यातच बुधवारी सकाळी हा पूल कोसळल्याचे कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा >>>‘भोलेबाबा’च्या आश्रमाबाहेर बंदोबस्त; मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिवान जिल्ह्यात गंडकी नदी पूल दुर्घटनेच्या ११ दिवसांपूर्वीच, २२ जून रोजी दारुंडा भागातील नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला होता. तसेच बिहारमधील मधुबामी, अरारियास, पूर्व चम्पारण आणि किशनगंज जिल्ह्यातही गेल्या दोन आठवड्यांत पूल कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी बिहारमधील बांधकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या दुर्घटनांच्या सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.