एक्स्प्रेस वृत्त, बारासात (पश्चिम बंगाल)

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात रविवारी सकाळी एका बेकायदा फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान सात जण ठार, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, कोलकात्याच्या उत्तरेला सुमारे ३० किलोमीटरवर असलेल्या दत्तपुकुर पोलीस ठाण्यांतर्गत नीलगंजच्या मोशपोल भागात फटाक्यांच्या कारखान्यात अनेक कामगार काम करत असताना हा स्फोट झाला. जखमींमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

हेही वाचा >>>शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर नूहमध्ये कडेकोट बंदोबस्त

हा स्फोट इतका भीषण आणि जोरदार होता की त्याच्या धक्क्याने कारखाना कोसळून त्याचे ढिगाऱ्यात रूपांतर झाले. परिसरातील काही घरांचेही नुकसान झाले. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केला आहे. मेमध्ये पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एगरा येथे एका अवैध फटाका कारखान्यात असाच स्फोट होऊन १२ जण ठार झाले होते.

हेही वाचा >>>कर्नाटकात भाजपच्या कार्यकाळातील करोना औषधखरेदीची चौकशी; निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एनआयए’ चौकशीची भाजपची मागणी

भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर टीका करताना पश्चिम बंगाल स्फोटकांचे आगर झाले असल्याचा आरोप केला. अवैध फटाका कारखाना मालकांना तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे संरक्षण आहे. पोलीस दुर्लक्ष करत आहेत. अवैध कारवायांना आळा घालत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत ( एनआयए) चौकशी करावी, असे पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे.