राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मविआमधील नाराजीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांचं आहे हे सांगताना शरद पवार यांनी यातील एक पक्ष नाराज झाला तर सरकार चालू शकणार नाही, असं मत व्यक्त केलं.

शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार तीन पक्षांचं आहे. यातील एक पक्ष नाराज झाला तर हे सरकार चालू शकणार नाही. सरकार चालवणारे लोक त्यांच्यात ही समजदारी आहे की ते कोणत्याही घटकपक्षाला नाराज करणार नाहीत. काँग्रेसची नाराजी आहे अशी तक्रार आतापर्यंत आम्ही ऐकली नाही. वर्तमानपत्रात जरूर वाचलं. मात्र, समोरासमोर बसलो तर असा कोणताही मुद्दा उपस्थित झाला नाही.”

“या सरकारला कोणताही धोका नाही. तसेच अडीच वर्षांनंतर जेव्हा पुन्हा निवडणुका होतील तेव्हा पुन्हा महाविकासआघाडीचंच सरकार येईल,” असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

पवारा-मोदी बैठकीनंतर भाजपा नेते म्हणाले, “शिवसेने एवढी कटूता राष्ट्रवादीसोबत नाही”, शरद पवारांचं प्रत्युत्तर म्हणाले…

यावेळी शरद पवारांना त्यांच्या मोदी भेटीनंतर भाजपा नेत्यांनी शिवसेने एवढी राष्ट्रवादीसोबत कटूता नसल्याच्या वक्तव्याबाबतही विचारणा करण्यात आली. यावर पवारांनी थेट उत्तर दिलं. “कोणी काय म्हटलं मला माहिती नाही. मात्र, आमची भूमिका स्पष्ट आहे की भाजपासोबत आमचे कोणाचेही संबंध राहणार नाहीत. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना मिळून भाजपाविरोधात पावलं उचलत आहेत आणि उचलत राहतील,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींसोबत काय चर्चा केली, बैठकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

केंद्रीय यंत्रणा मातोश्रीपर्यंत पोहचल्याने मोदींना भेटले का? पवार हसत म्हणाले…

शरद पवार म्हणाले, “केंद्रीय यंत्रणा मातोश्रीपर्यंत पोहचल्या म्हणून मी मोदींना भेटलेलो नाही. या यंत्रणा पोहचल्याचं मला माहिती नाही, मी त्याबद्दल काही ऐकलं नाही. मी पंतप्रधान मोदींना का भेटलो त्याची कारणं मी तुम्हाला सांगितली आहेत.”