पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यांच्याकडे गृहमंत्रालयासारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी-शाह आता केंद्र सरकारमध्ये एकत्र आले असले तरी त्याआधी दोघांनी गुजरातच्या मंत्रिमंडळात एकत्र काम केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शोलेमधल्या जय-वीरु प्रमाणे राजकारणात मोदी-शाह यांची जोडी ओळखली जाते. आज यशस्वी राजकीय नेता म्हणून अमित शाह यांना सर्वजण ओळखतात पण गुंतवणूकीमध्येही ते तितकेच हुशार आहेत. अमित शाह शेअर बाजारातील गुंतवणूकीमध्ये माहीर समजले जातात. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवणी यांच्या जोडीनंतर आता मोदी-शाह जोडीने भारतीय राजकारणात स्वत:ची जादू निर्माण केली आहे.

२०१४ ते २०१९ दरम्यान भाजपाने अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली एकापाठोपाठ एक विजय मिळवत देशभरात भाजपाचा विस्तार केला. अमित शाह भाजपाचे चाणक्य म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. २०१९ मध्ये अमित शाह यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली व गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून तब्बल साडेपाच लाख मताधिक्याने विजय मिळवला. गांधीनगरमधून त्यांनी लालकृष्ण आडवाणींचे सर्व विक्रम मोडले.

२०१० साली सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात त्यांनी काळ तुरुंगात घालवावा लागला. त्यावेळी गुजरातपासून दूर रहाण्याच्या अटीवर त्यांना सर्शत जामीन मिळाला होता. त्यानंतर चार वर्षांनी २०१४ साली अमित शाह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. गेल्या पाच वर्षात आपल्या कामाने अमित शाह यांनी राष्ट्रीय राजकारणात मोठी उंची गाठली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यांनी सुद्धा आपल्या कामातून स्वत:ला सिद्ध केले आहे.

जामिनावर साबरमती तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अमित शाह यांनी मी आता जातोय पण कमी लेखू नका. मी पुन्हा परत येईन असे म्हटले होते. आपल्या कामातून त्यांनी त्यांचे शब्द खरे करुन दाखवले. १९८९ पासून अमित शाह यांनी २९ निवडणुका लढवल्या आहेत. यात स्थानिक पातळीवरील निवडणुकांचा सुद्धा समावेश होता. २९ पैकी एकाही निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नाही हे विशेष आहे.

गुजरातच्या सारखेज विधानसभा मतदारसंघातून १९९७, १९९८, २००२ आणि २००७ असे सलग चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. अमित शाह यांना एकाचवेळी १२ खाती सांभाळण्याचा अनुभव आहे. निवडणूक रणनिती आखण्यामध्ये माहिर असलेल्या अमित शाह यांनी मोदींसह अनेक राज्यांमध्ये भाजपाला विजय मिळवून दिला.

अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, गुजरात, त्रिपुरा आणि आसाम या राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. पण दिल्ली, बिहार, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाला. अमित शाह यांचा जन्म १९६४ साली गुजरातमधल्या सधन वैष्णव कुटुंबात झाला. विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. १९८६ साली अहमदाबादमध्ये पहिल्यांदा त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर भेट झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Share broker shah to shahenshah amit shah
First published on: 31-05-2019 at 13:32 IST