Sharmishta Panoli : पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या शर्मिष्ठा पनोली नावाच्या विद्यार्थिनीला शुक्रवारी रात्री कोलकाता पोलिसांनी हरियाणाच्या गुरुग्राम येथून अटक केली आहे. या विद्यार्थीनीवर ऑपरेशन सिंदूरवरील पोस्टला उत्तर देताना आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर या विद्यार्थिनीने एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यानंतर चांगलाच वाद पेटला आहे. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावला आहे.

कोण आहे शर्मिष्ठा पानोली?

शर्मिष्ठा पनोली ही एक २२ वर्षीय विकलीचे शिक्षण घेणारी पुण्यातील विद्यार्थी आहे. याबरोबरच ती एक सोशल मीडिया एन्फ्लुअन्सर असून तिच्या व्हिडीओमध्ये ती बहुतांश वेळा कठोर भाषेचा वापर करते. तिने यापूर्वी पाकिस्तानवर टीका करताना अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत आणि ती ऑपरेशन सिंदूरबाबत यापूर्वी देखील बोलत आली आहे. पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, पानोलीने एक व्हिडीओ इस्टाग्रामवर पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने अनेक बॉलिवूड अभिनेत्यांवर ऑपरेशन सिंदूरबद्दल मौन बाळगल्याबद्दल टीका केली होती . हा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि या व्हिडीओनंतर काही जणांनी तिच्यावर टीका केली. इतकेच नाही तर तिला जिवे मारण्याच्या धमक्या देखील मिळू लागल्या होत्या. आता तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रचंड टीका झाल्यावर डिलिट करण्यात आला होता व्हिडीओ

टीकेचा प्रचंड भडीमार झाल्यान पानोलीने हा व्हिडीओ डिलिट केला आणि जाहीरपणे बिनशर्त माफी मागितली. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये शर्मिष्ठा म्हणाली होती की, “या प्रकरणी मी बिनशर्त माफी मागते. मी जे काही मांडले त्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत. मी कधीही कोणालाही जाणूनबुजून दुखावू इच्छित नव्हते, म्हणून जर कोणी दुखावले असेल तर मी त्याबद्दल माफी मागते. मला सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. यापुढे, मी सार्वजनिक पोस्ट करताना सावध राहीन. पुन्हा एकदा, कृपया माझी माफी स्वीकारा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१४ मे रोजी पोस्ट करण्यात आला होता व्हिडीओ

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या ऑपरेशन सिंदूर या लष्करी कारवाईबद्दल एका पाकिस्तानी सोशल मीडिया युजरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शर्मिष्ठा पानोलीने १४ मे २०२५ रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये तिने इस्लाम आणि मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल प्रक्षोभक आणि अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे. दरम्यान शर्मिष्ठा पनोलीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात बलात्कार आणि हत्येच्या धमक्या आल्या होत्या.