Sharmistha Panoli Arrest: पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या शर्मिष्ठा पानोली नावाच्या विद्यार्थिनीला शुक्रवारी रात्री कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली. या विद्यार्थीनीवर ऑपरेशन सिंदूरवरील पोस्टला उत्तर देताना आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार या विद्यार्थीनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करून “अपमानजनक आणि अपमानजनक टिप्पणी” होती.
दरम्यान या विद्यार्थीनीने हा व्हिडिओ नंतर डिलीट केला होता. या प्रकरणी कोलकाता येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलिस तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर, कोलकाता पोलिसांनी तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.
“हे प्रकरण शर्मिष्ठा पानोली नावाच्या तरुणीच्या इन्स्टाग्राम व्हिडिओशी संबंधित आहे. तरुणीच्या व्हिडिओमुळे एका विशिष्ट समुदायाच्या सदस्यांच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत”, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
अधिकाऱ्यांनी दावा केला की, शर्मिष्ठा पानोली आणि तिचे कुटुंब कथितपणे फरार झाल्यामुळे तिला कायदेशीर नोटीस बजावण्याचे प्रयत्न करुनही तिच्यापर्यंत नोटीस पोहोचवता आली नाही. त्यानंतर, न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले, ज्याच्या आधारे तिला गुरुग्राम येथून अटक करण्यात आली.
शर्मिष्ठाने मागितली होती माफी
दरम्यान या वादानंतर, शर्मिष्ठा पानोलीने सोशल मीडियावर बिनशर्त माफी मागितली होती. याचबरोबर इन्स्टाग्रामवरील तिचे व्हिडिओ आणि पोस्टही हटवल्या होत्या.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये शर्मिष्ठा म्हणाली होती की, “या प्रकरणी मी बिनशर्त माफी मागते. मी जे काही मांडले त्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत. मी कधीही कोणालाही जाणूनबुजून दुखावू इच्छित नव्हते, म्हणून जर कोणी दुखावले असेल तर मी त्याबद्दल माफी मागते. मला सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. यापुढे, मी सार्वजनिक पोस्ट करताना सावध राहीन. पुन्हा एकदा, कृपया माझी माफी स्वीकारा.”
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या ऑपरेशन सिंदूर या लष्करी कारवाईबद्दल एका पाकिस्तानी सोशल मीडिया युजरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शर्मिष्ठा पानोलीने १४ मे २०२५ रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये तिने इस्लाम आणि पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल प्रक्षोभक आणि अपमानास्पद टिप्पण्या केल्याचा आरोप आहे.
दरम्यान शर्मिष्ठा पानोलीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात बलात्कार आणि हत्येच्या धमक्या आल्या होत्या.