Shashi Tharoors Raction On Donald Trump Asim Munir Meet: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच पाकिस्तानचे फील्ड मार्शल आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. यावर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अमेरिकेतील लोक ओसामा प्रकरण इतक्या लवकर विसरू शकले नसते.”
“मला आशा आहे की जेवण चांगले झाले असेल. याचबरोबर मला अशीही आशा आहे की, यावेळी अमेरिकेने पाकिस्तानला आठवण करून दिली असेल की, ते त्यांच्या देशात दहशतवाद्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देत नाहीत, शस्त्रास्त्रे किंवा वित्तपुरवठा करत नाहीत,” असे शशी थरूर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले.
थरूर पुढे म्हणाले की, “ओसामा बिन लादेनला लष्करी छावणीजवळ सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवण्यात पाकिस्तानचा थेट हात होता, हे अमेरिकन जनता सहज विसरणार नाही आणि त्यांना ते माफही करणार नाही.”
२६ जणांचा बळी घेणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शशी थरूर अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील आणि कोलंबियाला गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचा भाग होते.
दरम्यान, असीम मुनीर यांच्यासोबतच्या बैठकीच्या काही तास आधी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या युद्ध थांबवण्याबाबतच्या भूमिकेचे कौतुक केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रविराम केल्याचा दावा पुन्हा करत ट्रम्प म्हणाले की, “मी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रविराम केला. मला पाकिस्तान आवडतो आणि मोदी हे एक उत्तम व्यक्ती आहेत. शस्त्रविरामासाठी पाकिस्तानकडून हा माणूस (असीम मुनीर) आणि भारताकडून पंतप्रधान मोदी यांची भूमिका महत्त्वाची होती. भारत आणि पाकिस्तान अणुसंपन्न देश आहेत. मी दोन प्रमुख राष्ट्रांमध्ये शस्त्रविराम केला.”
दरम्यान, भारताने डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-पाकिस्तानमधील शस्त्रविरामाच्या दाव्यांचा वारंवार विरोध केला असून, शस्त्रविराम हा द्विपक्षीय निर्णय असल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी नुकतेच केलेल्या या दाव्याच्या काही तास आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांचा दावा फेटाळला होता.