Shashi Tharoor vs Peter Navarro on Anti-India Remark : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार शशी थरूर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ (आयात शुल्क) धोरणाचे सूत्रधार व त्यांचे व्यापारविषयक सल्लागार पीटर नवारो यांच्यावर निशाणा साधला आहे. थरूर म्हणाले, “दोन देश जवळ येत असताना नवारो यांनी भारतावर केलेली टीका योग्य नव्हती.” भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवावं यासठी अमेरिकेच्या अध्यक्षांनी अनेक प्रयत्न केले. आधी दबाव आणि नंतर टॅरिफ अस्त्र वापरून पाहिलं. परंतु, भारताने त्याला दाद दिली नाही. तेव्हापासून नवारो हे सातत्याने भारतावर टीका करत आहेत. या टीकेला थरूर यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

पीटर नवारो भारताला ‘अहंकारी’, ‘महाराजा ऑफ टॅरिफ’, ‘Laundromat for Russia’ (रशियाचा काळा पैसा पांढरा करण्याचं माध्यम) असं म्हटलं होतं. तसेच रशिया युक्रेन युद्धाला मोदींचं युद्ध असं म्हटलं होतं. नवारो एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, “भारत रशियन तेल खरेदी करत असल्यामुळे ब्राह्मणांना फायदा होत आहे.” ही ब्राह्मणांची नफेखोरी असल्याची टिप्पणी देखील त्यांनी केली होती. नवारो यांच्या या वक्तव्याकडे भारतात जातीय तेढ निर्माण करणे, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे.

नवारोंविरोधात शशी थरूर मैदानात

पीटर नवारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवणारा एक फोटो देखील शेअर केला होता. “ट्र्म्प प्रशासनात महत्त्वाचं पद सांभाळणाऱ्या नेत्याकडून भारतविरोधी वक्तव्यांची आणि अशा कृत्याची अपेक्षा नाही”, असं थरूर यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर आयात शुल्क लादलं आहे. भारतावरही ५० टक्के आयात शुल्क लादण्यात आलं आहे. याबाबत थरूर म्हणाले, “ट्रम्प यांना वाटतं की आयात शुल्क लादणे हे त्यांच्यासमोर असलेल्या समस्यांवरील जादुई साधन आहे. ट्रम्प यांच्या भाषणांमधील, समाजमाध्यमांवरील पोस्टमधील अपमानास्पद शब्द आणि त्यानंतर त्यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी केलेली आक्षेपार्ह वक्तव्ये यामुळे भारतात त्यांच्याविरोधात संताप आहे.

थरूर म्हणाले, “ट्रम्प व नवारो यांना वाटतंय की टॅरिफ हे त्यांच्या देशासाठी उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असू शकतं. कारण अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. त्यांना वाटतंय की टॅरिफद्वारे ते महसूल जमा करतील आणि कर्ज फेडू शकतली.”