पंजाबच्या जलालाबादमध्ये अकाली दलाचे अध्यक्ष  सुखबीर बादल यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. अकाली दलाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर काँग्रेस व अकाली दलाचे कार्यकर्ते देखील आपसात भिडले होते. यावेळी तुफान दगड-विटा एकमेकांवर फेकण्यात आल्या, एवढच नाही तर गोळीबार झाल्याची देखील माहिती समोर येत आहे.

जलालाबादमध्ये नगर काउन्सिलची निवडणूक होत आहे. काल काँग्रेस व आम आदमी पार्टीच्या कार्यकर्ते आपसात भिडले होते. आज अकाली दलाचा उमेदवार अर्ज दाखल करणार होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल हे तिथं पोहचले होते. सुखबीर बादल यांच्या वाहनांचा ताफा येताच, त्यावर जोरदार दगडफेक सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला.

कार्यकर्त्यांनी बॅरिडकेड्स हटवून पळापळ सुरू केली व जोरदार दगडफेक करण्यात आली. याच दरम्यान गोळीबार देखील केला गेला. सुखबीर बादल यांच्या गोडीवर तुफान दगडफेक झाली.

या घटनेनंतर अकाली दल व काँग्रेस कार्यकर्ते आपसात भिडले, ज्यामध्ये काहीजण जखमी झाले. अकाली दलाने आरोप केला आहे की, आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करू नये म्हणून काँग्रेसकडून असं करण्यात आलं आहे. यानंतर घटनास्थळी मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे.

अकाली दलाकडून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांच्या नेतृत्वात या घटनेचा तपास केला जावा अशी देखील मागणी केली गेली आहे.