Arvind Sawant on Pahalgam Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केली होती. यानंतर भारताने ऑपरेसन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पीओके येथील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. या ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा सुरू आहे. या चर्चेत आज (सोमवार) शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरचं नाव आणि या हल्ल्यातील दहशतवादी अद्याप फरार असल्याच्या मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली.

पहलगाम हल्ला झाला तेव्हा तेथे सशस्त्र दलाचे जवान किंवा पोलीस का नव्हते? असा प्रश्न अरविंद सांवत यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान उपस्थित केला. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरबद्दल बोललं जातं, तेव्हा त्याची सुरूवात ‘ऑपरेशन सिंदूर’ का? इथून होते. पहलगामची घटना घडली म्हणून ऑपरेशन सिंदूर झालं. मी काही काळासाठी मंत्री होतो, जेव्हा मी इलेक्ट्रीक बसचे उद्धाटन करण्यासाठी कश्मीर येथे गेलो होतो, तेव्हा जागोजागी पोलीस, जवान उभे राहिलेले असायचे. थोड्या-थोड्या अंतरावर सशस्त्र जवान उभे असायचे. मग असं काय झालं की त्या दिवशी पहलगाम येथे एकही सशस्त्र जवान, पोलीस नव्हते. आपले पर्यटक तेथे आलेले आहेत आणि तिथं पोलिसही नाहीत? तेथे जवान राहाणार नाहीत, असे आदेश कोणी दिले होते, चौकशी येथून झाली पाहिजे.

पुढे बोलताना सावंत म्हणाले की, नुकतेच मुंबई बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. ज्यांना दहशतवादी म्हणून पकडण्यात आले होते. कनिष्ठ न्यायालायने त्यांना शिक्षा दिली. पाच लोकांना फाशीची शिक्षा दिली. उच्च न्यायालायाने त्या सर्वांना सोडून दिलं. मग त्यांना १९ वर्ष तुरुंगात का ठेवलं? याचा अर्थ आजपर्यंत आपण दहशतवादी पकडू शकलेलो नाहीत.

पुलवामा हल्ल्याच्या वेळी सत्यपाल मलिक जे तुमच्या पक्षाचे होते, गव्हर्नर होते… आजही त्यांचं विधान आठवा, ते आजही सांगतात की, वारंवार सांगून देखील तुम्ही जवानांना रस्त्याच्या मार्गाने पाठवलं. जैश-ए-मोहम्मदने हल्ला केला. ४० जवान शहीद झाले. आजही चौकशी झाली नाही, असेही सावंत म्हणाले.

पहलगाम हल्ल्यानंतर राबवलेल्या मोहिमेला देण्यात आलेल्या नावावरून देतील अरविंद सावंत यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, सिंदूर नाव देता? लोकांच्या भावनांशी खेळता? सिंदूर कोणाचा हिरावला गेला,आपल्या बहिणींचा सिंदूर हिरावला गेला ना? मग ज्यांनी हे केलं त्या दहशतवाद्यांना तुम्ही आजपर्यंत पकडू शकला नाहीत…. आपण दहशतवाद्यांना लक्ष्य केले, आपण लोकांवर हल्ले केले नाहीत, याचा कौतुक करतो. पण यानंतरही दहशतवाद्यांना पकडलं जात नाही तेव्हा तुमच्या मनात काहीच वाटत नाही का? ढोल वाजवता? बिहारमध्ये जाऊन राजकीय भाषण केलं. बिहारमध्ये गेलात, पण पहलगाम येथे गेला नाहीत. तुम्ही आजवर मनिपूरमध्ये गेले नाहीत, अशा शब्दात सावंत यांनी सत्ताधारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही आमच्या लष्कराचे कौतुक करू, तुमचे करणार नाही. यामध्ये तुमची काय शूरता होती. जर तुम्ही स्वातंत्र्य दिलं होतं तर मग कोणत्याही अटीशीवाय युद्धविराम का केला? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तर पकपक करतात… त्यांची तर बकबक आजही सुरू आहे, की त्यांनी युद्ध थांबवलं. जर ते शरणार्थी होते तर मग आटी लावल्या पाहिजे होत्या, त्यानंतरही युद्ध सुरू राहिलं. आपल्या नागरिकांवर हल्ले होत राहिले. आपण फक्त पाहत राहणार का?, असेही अरविंद सावंत म्हणाले.