काश्मीरमध्ये शहीद होणार्‍या जवानांना श्रद्धांजल्या वाहून आणि उसासे सोडून काय होणार. हंदवाडाच्या लष्करी तळावर कर्नल शर्मा यांच्यासह पाच वीर जवानांचे मृतदेह तिरंग्यात गुंडाळून ठेवले. हे छायाचित्र प्रत्येक देशवासीयाला वेदना देणारे आहे. जय हिंदचा नारा घशातच गुदमरून टाकणारे हे दृष्य आहे. कोरोना योद्ध्यांवर हिंदुस्थानी लष्कर आकाशातून फुलांची उधळण करीत असताना कश्मीरची जमीन कर्नल शर्मा यांच्यासह पाच वीर जवानांच्या रक्ताने भिजली आहे. हे चित्र चांगले नाही. या सर्व शहिदांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा हो! त्यांना मानवंदना देण्यासाठीही बॅण्ड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा. या पाच जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठीही एखादा सर्जिकल स्ट्राइक गाजावाजा न करता होऊ द्या असं शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सारा देश कोरोनाशी युद्ध लढत आहे व हे युद्ध आणखी किती  काळ चालेल ते सांगता येत नाही. या गडबडीत प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय चालले आहे? त्याकडे आपला कानाडोळा झाला आहे. हा कानाडोळा शनिवारी बहुधा सैल झाला असावा. कश्मीरच्या सीमेवर दहशतवाद्यांच्या कुरापती आणि हल्ले वाढले आहेत. उत्तर कश्मीरमधील हंदवाडा क्षेत्रात शनिवारी रात्री दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली त्यात हिंदुस्थानचे मोठे नुकसान झाले आहे. कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह पाच जवानांचे बलिदान झाले असून हा सर्व प्रकार धक्कादायक आहे,” अशी भावना शिवसेनेने व्यक्त केली आहे.

“देशातील डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस हे कोरोना योद्धे आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी भावनिक आवाहन केले आहे. या कोरोना योद्ध्यांवर फुले बरसण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सैन्याच्या तिन्ही दलांना मैदानात आणि आकाशात उतरवले. कोरोना संकटाच्या काळात अहोरात्र कर्तव्य बजावणार्‍या कोरोना योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी आपल्या लढाऊ विमानांनी, हेलिकॉप्टर्सनी आकाशातून या कोरोना योद्ध्यांवर पुष्पवृष्टी केली. काही ठिकाणी लष्कराच्या बॅण्ड पथकानेही मानवंदना दिली. पायदळ व नौदलानेही या मानवंदना सोहोळ्यात भाग घेतला. हासुद्धा एक वेगळाच सोहळा घडवून आणला, पण त्याचवेळी कश्मीरात पाकड्या अतिरेक्यांबरोबर चकमक सुरू होती. कर्नल आशुतोष शर्मा व त्यांचे चार सहकारी देश रक्षणासाठी प्राणाची बाजी लावून लढत होते. या लढाईत हे पाचही वीर हुतात्मा झाले. पंतप्रधान मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हुतात्मा झालेल्या या शूर जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांचे कर्तव्य बजावले आहे. पाचही वीरांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान केले आहे व त्यातील एका वीराचे नाव सबइन्स्पेक्टर एस. ए. काझी असे आहे. सध्या देशात जे हिंदू -मुसलमान असा राजकीय खेळ करीत आहेत त्यांनी कर्नल शर्मा यांच्या खांद्यास खांदा लावून पाकड्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या काझी यांचे बलिदान विसरू नये,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

“कोरोनाच्या स्थितीत आपण कश्मीरचे युद्ध विसरलो आहोत, पण पाकिस्तानची युद्ध खुमखुमी कायम आहे. घुसखोरी व आमच्या जवानांवरील हल्ले सुरूच आहेत. कश्मीरात जवानांवर हल्ले होत आहेत. तसे देशभरात पोलिसांवरही हल्ले होत आहेत, पण ते कोरानासंदर्भात. महाराष्ट्रातच गेल्या महिनाभरात 173 वेळा पोलिसांवर हल्ले झाले आहेत, पण कश्मिरातील पाकड्यांचे हल्ले वेगळे आहेत. कश्मिरातील 370 कलम वगैरे हटवल्यापासून तेथे लॉक डाऊन सुरूच होते. लोकांच्या मुक्त स्वातंत्र्यावर बंधने लादून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला, पण ही शांतता म्हणजे भूगर्भातली खदखद ठरताना दिसत आहे. लॉकडाऊन काळात कश्मिरात घुसखोरांनी हल्ले केलेच. शनिवारी रात्री अशाच एका हल्ल्यात कर्नल शर्मा यांचे जे बलिदान झाले हे त्याचेच प्रमाण आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“कर्नल शर्मा यांचे बलिदान हे साधे नाही. शर्मा हे 21 राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांच्याबरोबर पाच बटालियनचे मेजर अनुज सूद, नायक राजेश व लान्स नायक दिनेशही मारले गेले आहेत. हिंदुस्थानी सैन्याने 5 वर्षानंतर दुसर्‍यांदा दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत कमांडिंग ऑफिसर गमावला आहे. 2015 मध्ये कुपवाडातील हाजीनाका जंगलात 41 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले होते. कर्नल महाडिक हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. कश्मीरच्या जंगलात आजही दहशतवादी दबा धरून बसले आहेत व त्यांचे मनसुबे काही चांगले नाहीत. त्यात नुकसान होत आहे ते आमच्या सैन्याचे. कर्नल शर्मा हे एक साहसी अधिकारी होते. फक्त 45 वर्ष त्यांचे वय. त्यांचा आतापर्यंत दोन वेळा शौर्यचक्र दे ऊन गौरव करण्यात आला होता. आपल्या लढाऊ तुकडीसह ते शत्रू ठिकाणावर हल्ले करताना स्वत: आघाडीवर राहत असा त्यांचा इतिहास आहे. कर्नल शर्मा यांचा त्यांची मुलगी तमन्ना हिच्याबरोबर एक फोटो प्रसिद्ध झाला आहे. तो भावूक करणारा आहे. तमन्नाचा वाढदिवस 1 मे रोजी होता व 3 मे रोजी तिचे प्रिय वडील देशाचे रक्षण करताना वीरगतीस प्राप्त झाले. या सर्व शहिदांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा हो! त्यांना मानवंदना देण्यासाठीही बॅण्ड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा. या पाच जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठीही एखादा सर्जिकल स्ट्राइक गाजावाजा न करता होऊ द्या,” अशी भावना शिवसेनेने व्यक्त केली आहे.

“एकाच वेळी आमचे पाच शूर जवान मारले जातात हे चांगले लक्षण नाही. आमच्याच भूमीवर आमचे जवान वारंवार मारले जातात. दिल्लीत एक मजबूत आणि प्रखर राष्ट्रवादी देशभक्त वगैरे सरकार असताना हे घडत आहे. कोरोनाशी युद्ध व त्यातील योद्ध्यांना मानवंदना सुरूच राहील, पण कश्मीरमध्ये दुर्लक्ष होऊन चालणार नाही. 370 कलम काढले, कश्मीरचे तुकडे केले याबद्दल वाहवा झाली. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांचे मजबूत इरादे पक्के होते म्हणून ते झाले हे मान्य करावेच लागेल, पण आपल्या जवानांचे बलिदान थांबलेले नाही व सैन्याचे सामुदायिक शिरकाण सुरूच राहिले,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena saamana editorial on kashmir terrorist attack sgy
First published on: 05-05-2020 at 07:45 IST