Udaipur : राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका विदेशी महिला पर्यटकावर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडित महिला फ्रेंच नागरिक असून ती २२ जून २०२५ रोजी दिल्लीहून उदयपूरला पर्यटनासाठी आली होती. सोमवारी तिच्यावर अत्याचार घडल्याची घटना घडली. आरोपी तरुणाने पहिल्यांदा एका कॅफेमध्ये पार्टी दरम्यान महिलेशी मैत्री केली. त्यानंतर तिला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने त्याच्या अपार्टमेंटमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेतील आरोपीचं नाव सिद्धार्थ असं असून तो फरार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, पीडित महिलेवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आम्ही घटनेची अधिक चौकशी करणार आहेत. मात्र, उदयपूरच्या बडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
उदयपूरचे पोलीस अधीक्षक योगेश गोयल यांनी घटनेची माहिती देताना सांगितलं की, “ही घटना सोमवारी रात्री एका कॅफेमध्ये पार्टी झाल्यानंतर घडली. संबंधित आरोपी पीडितेला पार्टीनंतर त्याच्या भाड्याच्या घरात घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. महिलेच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे”, असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.
दरम्यान, ही महिला १७ एप्रिलपासून भारतात असून २२ जून रोजी ही महिला दिल्लीहून एका बसने उदयपूरला पोहोचली होती. त्यानंतर ही घटना घडली. पोलिसांनी सांगितलं की आरोपीला अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आलं आहे. तसेच या घटनेची माहिती दिल्लीतील फ्रेंच दूतावासालाही देण्यात आली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.