Shubhanshu Shukla : भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरुन ऑक्सिऑम-४ या अंतराळ मोहिमेच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्थानकाच्या दिशेने उड्डाण केलं. नासाचं फॉल्कन-९ या यानाने अवकाशात झेपावलं. शुभांशू शुक्ला यांनी या मोहिमेसाठी निघत असताना सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल सगळ्यांचे आभार मानले. दरम्यान शुभांशू शुक्ला आणि शाहरुख खानचं एक खास गाणं ही मोहीम यांचं एक खास कनेक्शन तुम्हाला माहीत आहे का?
लाँच डेच्या दिवशी शाहरुख खानचं गाणं निवडलं अँथम म्हणून
शुभांशू शुक्लाने मोहिमेचं अँथम म्हणजेच मोहिमेचं गाणं म्हणून शाहरुख खानच्या स्वदेस चित्रपटातील यूँ ही चला चल राही हे गाणं निवडलं आहे. हे गाणं संगीतकार ए.आर. रहमानने कंपोज केलेलं आहे. @Axiom_Space या एक्स हँडलवर ही माहिती पोस्ट करण्यात आली आहे. यूँ ही चला रहा चल हे गाणं शाहरुख खान आणि मकरंद देशपांडे या दोन कलाकारांवर चित्रित झालेलं आहे. स्वदेस या चित्रपटातला मोहन भार्गव (शाहरुख खान) नासा या संस्थेत काम करत असतो आणि सुट्टी घेऊन आपल्या गावी आपल्या आईसमान कावेरी अम्माला भेटायला जात असतो तेव्हा हे गाणं चित्रपटाच्या प्रसंगात येतं. हेच गाणं शुभांशू शुक्ला यांनी आपल्या मोहिमेचं अँथम म्हणून निवडलं आहे. त्यामुळे शाहरुख खान आणि शुभांशू शुक्लांची ही मोहीम यांचं कनेक्शन समोर आलं आहे.

शुभांशू शुक्लांची अंतराळ मोहीम
‘ॲक्सिऑम-४’ मोहिमेअंतर्गत अन्य तीन अंतराळवीरांबरोबर शुभांशू शुक्ला यांनी आज अवकाशात उड्डाण केलं. नासाच्या फॉल्कन-९ या रॉकेटद्वारे त्यांनी अवकाशात उड्डाण केलं. याआधी ३ एप्रिल १९८४ रोजी भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाच्या मदतीने अवकाश मोहीमेवर गेले होते. ४१ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय अंतराळवीर आज अवकाशात झेपावला आहे. शुभांशू शुक्ला हे मूळचे लखनौचे रहिवासी असून ते वायूदलात ग्रुप कॅप्टन या पदावर कार्यरत आहेत. १ वर्षाचं प्रशिक्षण व कठोर मेहनतीनंतर त्यांची नासाने या मोहीमेसाठी निवड केली आहे.
अंतराळातून शुभांशू शुक्लांचा संदेश काय?
शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातून पृथ्वीवर पहिला संदेश पाठवला आहे. या संदेशात शुक्ला यांनी म्हटलं आहे की “नमस्कार, माझ्या प्रिय बांधवांनो, what a ride… ४१ वर्षांनंतर आपण पुन्हा एकदा अंतराळ प्रवासावर निघालो आहोत. ही राइड भारी आहे. आम्ही सध्या ७.५ किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालत आहोत. माझ्याबरोबर, माझ्या खांद्यावर आपला तिरंगा आहे. हा तिरंगा मला सांगतोय की मी या प्रवासात एकटा नाहीये. मी तुम्हा सर्वांबरोबर इथे आहे”.