कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांनी केलेल्या एका विधानामुळे कर्नाटकच्या राजकारणात खांदेपालट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. सिद्धरामय्यांच्याऐवजी आता सतीश जारकीहोळी नवे मुख्यमंत्री होण्याची चर्चा कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. माझे वडील सिद्धरामय्या हे राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात आहेत असं विधान यतिंद्र यांनी केलं त्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत.
यतिंद्र सिद्धरामय्यांचं वक्तव्य काय?
माझे वडील (सिद्धरामय्या) त्यांच्या राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. आता कर्नाटकला प्रगतीशील आणि विचारशील नेतृत्वाची गरज आहे’ या आशायचं विधान सिद्धारमय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धारमय्या यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात नेतृत्व परिवर्तनाच्या शक्यतांवर चर्चा रंगू लागली आहे. यतिंद्र यांनी सतीश जारकीहोळी यांचं नाव घेतलं आहे. कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री पदासाठी सतीश जारकीहोळी हे योग्य उमेदवार असल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे कर्नाटकच्या सत्ताधारी काँग्रेस पक्षात अंतर्गत हालचालींना चांगलाच वेग आला आहे. सतीश जारकीहोळी हे सध्या बेळगावचे पालकमंत्री आहेत. यतिंद्र सिद्धरामय्यांनी संत कनकदास यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात सतीश जारकीहोळी यांचं नाव घेतलं आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात ‘नोव्हेंबर क्रांती’चा उल्लेख केला, कर्नाटकच्या नव्या राजकीय समीकरणांची ही नांदी मानली जाते आहे.
सतीश जारकीहोळी कोण आहेत?
सतीश जारकीहोळी हे बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी मतदारसंघातून निवडून आले आहेत. तसंच ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यांची मुलगी प्रियांका जारकीहोळी या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. सतीश जारकीहोळी यांचा बेळगाव आणि राज्याच्या राजकारणात चांगलाच दबदबा आहे. सध्या ते बेळगावचे पालकमंत्री असून जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा शब्द हा अंतिम मानला जातो. तसंच सिद्धरामय्यांचे ते निकटवर्तीय आहेत. त्यामुळे सिद्धरामय्यांनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी त्यांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत.
उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची प्रतिक्रिया काय?
यतिंद्र सिद्धारमय्या यांच्या वक्तव्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “यतिंद्र यांनी नेमकं काय म्हटलं, त्यांचं मत काय आहे ते त्यांनाच विचारा. मी आणि मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे की आम्ही पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य करू आणि एकत्र काम करू.” कर्नाटकमध्ये जेव्हा काँग्रेसची सत्ता आली तेव्हाच मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये डी.के. शिवकुमार होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं. यानंतर ते काहीसे नाराजही झाले होते. आता सिद्धरामय्यांच्या मुलाचं विधान चर्चेत आल्यानंतर शिवकुमार यांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.
