सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पंजाब कोर्टाने गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मूसेवाला यांच्या हत्येचा कट रचणारा बिष्णोई मुख्य आरोपी असून त्याला कडक सुरक्षाव्यवस्थेत मानसा येथून मोहालीला हलवण्यात येत आहे. बिष्णोईला बुलेटप्रूफ गाडीतून नेलं जात असून जवळपास दोन डझन गाड्यांमधून १०० पोलिसांचा ताफा त्याची सुरक्षा करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णोईला पुढील काही काळासाठी अज्ञात ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.

सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणी पंजाब पोलिसांची विशेष तपास पथक विष्णोईची चौकशी करणार आहे. मूसेवाला हत्या प्रकरणात बिष्णोईची नेमकी काय भूमिका होती याची माहिती मिळवण्याचा विशेष पथकाचा प्रयत्न आहे.

बुधवारी पंजाब पोलिसांनी बिष्णोईला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं. दिल्ली पोलिसांकडून ट्रान्झिट रिमांड मिळवल्यानंतर पंजाब पोलिसांनी बिष्णोईला मानसा येथे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं होतं. मानसा जिल्ह्यातच २९ मे रोजी मूसेवाला यांची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, पंजाबचे महाधिवक्ता स्वत: दिल्लीमधील पटियाला हाऊस न्यायालयात हजर झाले आणि ताबा देण्याची मागणी केली. सिद्धू मूसेवाला प्रकरणाचा तपास करणार्‍या एसआयटीने लॉरेन्स बिष्णोईला अटक करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मानसामधील स्थानिक न्यायालयाने आधीच त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.

पंजाब पोलिसांच्या याचिकेला बिष्णोईच्या वकिलांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला अटक करण्याची आणि ताबा देण्याची परवानगी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मूसेवाला हत्या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोईचं नाव आल्यानंतर त्याच्या वकिलांनी दिल्लीमधील पटियाला कोर्टात अर्ज दाखल करत सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. पोलीस बनावट चकमक करत बिष्णोईची हत्या करतील किंवा विरोधी टोळी हल्ला करु शकते असा वकिलांचा दावा होता.