समाजमाध्यमांतील वाढलेल्या प्रचाराचा परिणाम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून समाजमाध्यमांतील प्रचारावर भर देण्यात आल्यामुळे पारंपरिक प्रचार साहित्याच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. छापील पत्रके, फ्लेक्स, झेंडे, उपरणी, फेटे आदी प्रचार साहित्याच्या मागणीत जवळपास ४५ टक्क्य़ांहून अधिक घट झाल्याचे निरीक्षण व्यावसायिकांनी नोंदवले आहे.

निवडणूक आली की, बाजारपेठेत तेजी येते हा सर्वसाधारण शिरस्ता. प्रचार साहित्यापासून खाद्यपदार्थाचे उत्पादक, वाहतूक व्यावसायिक अशा विविध घटकांना मागणी वाढते. मात्र, ही लोकसभा निवडणूक त्याला अपवाद ठरताना दिसत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून राजकीय पक्षांकडून समाजमाध्यमांतील प्रचारावर भर देण्यात येत आहे. समाजमाध्यमांतील प्रचार परिणामकारक ठरल्याचे २०१४ च्या निवडणुकीत दिसून आल्याने या निवडणुकीत राजकीय पक्षांनी समाजमाध्यमांतील प्रचारावर जास्त खर्च केला आहे. या पाश्र्वभूमीवर, पारंपरिक प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची मागणी घटली आहे.

‘शेषन यांनी आचारसंहिता लागू केल्यापासून व्यवसायात घट होऊ लागली. मात्र, आता मागणी घटण्याने कळस गाठला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीतील प्रचार साहित्याच्या मागणीत जवळपास ४५ टक्के घट झाली आहे. समाजमाध्यमांवर राजकीय पक्षांनी प्रचारासाठी वाढवलेला खर्च हा मुख्य भाग आहेच; पण सी व्हिजिल या अ‍ॅपद्वारे सर्वसामान्य नागरिकही आचारसंहिता भंगाची तक्रार करू शकत असल्याने राजकीय पक्षांकडून सावधगिरी बाळगली जात आहे, असे मुरुडकर झेंडेवालेचे संचालक गिरीश मुरुडकर यांनी सांगितले. यावर उपाय म्हणून काही नव्या पद्धतीचे कल्पक प्रचार साहित्य तयार करण्यात आले आहे. समाजमाध्यमांत होणारे ‘व्हायरल’ लक्षात घेऊन हे प्रचार साहित्य डिझाइन करण्यात आल्याचे मुरुडकर यांनी नमूद केले. माहेश्वरी खादी भांडारचे पंकज सारडा म्हणाले,‘गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रचार साहित्याच्या विक्रीत घट झाली आहे. जवळपास ६० टक्के घट झाली आहे. अर्थात हा समाजमाध्यमांतील वाढलेल्या प्रचाराचा परिणाम आहे असे वाटत नाही.’

प्रचार साहित्यामध्ये केवळ टोपीचीच चलती असल्याचे दिसून येत आहे. सध्या कडाक्याचे ऊन असल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून टोप्यांना मागणी आहे, असे गिरीश मुरुडकर यांनी सांगितले.

फलकांनाही मागणी नाही

पूर्वी उमेदवारांकडून भिंती रंगवून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत असे. त्यानंतर फ्लेक्सचा वापर प्रचारामध्ये वाढला. निवडणूक कचेरीचे फलक, वाहनांना लावण्यासाठीचे फलक, प्रचार फेऱ्यांमध्ये वापरण्यात येणारे फलक, कोपरा सभांसाठी वापरण्यात येणारे फलक यासाठी फ्लेक्सचा वापर केला जात असे. मात्र, या वेळी फ्लेक्सच्या मागणीतही जवळपास ५० टक्के घट झाल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. ‘निवडणुकीच्या प्रचारात होणारा फ्लेक्सचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे फ्लेक्सचा व्यवसाय जवळपास ५० टक्क्य़ांनी कमी झाला आहे. त्याचा परिणाम व्यावसायिकांच्या उत्पन्नावरही झाला आहे,’ असे पिंपरीतील फ्लेक्स व्यावसायिक दीपक परदेशी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Significant decline in demand for promotional material
First published on: 11-04-2019 at 00:54 IST